जळगाव । आकाशवाणी चौफुलीवरील सिग्नलवर मिनी ट्रकला धडक दिल्यानंतर इण्डेंन गॅसच्या ट्रकच्या मद्यपी चालकाने तेथून भरधाव वेगात ट्रक घेवून पसार होण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अंजिठा चौफुलीवर चालकास पकडल्यानंतर त्याने आगपेटी घेवून सिलेंडरच्या ट्रकवर चढत स्फोट करण्याची धमकी देवून गोंधळ घातल्याचा प्रकार शनिवारी घटना होता. याप्रकरणी आज चालकासह मालकाविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चालकाच्या गुन्ह्यात कलमांमध्ये वाढ देखील केली आहे.
गुन्ह्यात वाढले कलम
शनिवारी सकाळी मनमाड येथून इण्डेंन गॅसचा मालवाहू ट्रक (कं. एमएच.04.बीयु.9379) मध्ये दिडशे ते दोनशे सिलेंडर घेवून जात असलेल्या मद्यपी चालक संतोष बाबुराव केकांत याने आकाशवाणी चौकात अनिकेत ट्रान्सफोर्टचा मिनी ट्रक (कं.एमएच.12.एलटी.6099) ला जोरदार धडक देत पसार होण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मद्यपी चालकास अंजिठा चौफुली येथे अल्लाउद्दीन या दुचाकीस्वाराने पकडले. मात्र, आपल्याला चोप बसेल या भितीने मद्यपी चालक केकांत याने चक्क आगपेटी घेवून ट्रकवर चढत सिंलेडरचा स्फोट करण्याची धमकी देत धिंगाणा घातला होता. त्यानंतर अल्लाउद्दीन यानी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी मद्यपी चालक यांच्या गुन्ह्यात कलम 285 हा वाढविण्यात आला आहे. तर ट्रक मालक मनोज गायकवाड याच्याविरूध्द देखील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.