स्मशानभुमी विकसित करण्यासाठी 40 कोटींची तरतूद करा

0
महापौरांनी केली शहरातील 36 स्मशानभुमींची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी 
महापौर राहुल जाधव यांची अधिकार्‍यांना सूचना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीलगतची जागा आणि डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करावे. शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमी आणि दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमीची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी केली. यावेळी महापौरांना पाण्याची कमतरता, ठिकठिकाणी वाढलेले गवत, घाटांची दुरवस़्था, त्यातील शेड आदी सर्वच ठिकाणी दुरूस्ती करण्याची गरज होती, हे लक्षात आले.
अधिकार्‍यांची घेतली बैठक
या पाहणीच्यावेळी शहरातील विविध भागातील स्मशानभुमींची दुरवस्था आणि त्यातील गैरसोयी जाणून घेतल्या. या पाहणीमध्ये महापौरांनी स्मशानभूमीतील अडचणी, त्यातील त्रुटी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन स्मशानभुमी पर्यावरणपुरक पद्धतीने विकसित करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, बाबासाहेब गलबले, प्रविण लडकत, के.डी.फुटाणे, देवन्ना गट्टूवार, दिपक सुपेकर, प्रशांत पाटील, प्रविण घोडे, श्रीकांत सवणे, नितीन देशमुख, रविंद्र पवार, एकनाथ पाटील, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे बैठकीला उपस्थित होते. उद्यान आहे की स्मशानभुमी आहे असा प्रश्‍न नागरिकांना पडेल अशा पद्धतीने त्या स्मशानभुमीचा कायापालाट करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत.
अद्ययावत यंत्रणा उभारणार
महापौर राहूल जाधव म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीमध्ये दहन विधीसाठी कमी सरपण, लाकडे लागतील अशी अद्ययावत यंत्रणा, मशिन उपलब्ध करुन घ्यावी. स्मशानभुमीची जागा व लगतच्या डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करणे. सर्व स्मशानभुमी, दफनभुमी व दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात.
वेळच्या वेळी देखभाल दुरूस्ती करणे, रंगरंगोटी, वृक्षारोपन करणे, सर्व स्मशानभुमी, दफनभुमी आणि दशक्रीया विधी घाट येथे महिला व पुरूषांसाठी स्नानगृह व शौचालयाची व्यवस्था करण्यात यावे. वेटींग शेड वाढविणे. पाण्याची आरसीसी टाकी बांधणे, विद्युत विषयक सर्व सुविधा पुरविणे, सोलर सिस्टीम बसविणे, विद्युत दाहिणी बसविणे, सर्व दफनभुमीला एकसारखी सिमाभिंत बांधणे इत्यादी कामे तातडीने करण्याची गरज आहे.