स्मशानभूमीचे काम लवकर सुरु करावे – चिंचवडे

0

महापालिका आयुक्तांना दिले निवेदन

रावेत : प्रभाग क्रमांक 17 मधील वाल्हेकरवाडी परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर सुरु करावे, यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे, असे नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांनी सांगितले. नगरसेविका चिंचवडे म्हणाल्या की, यापुर्वी आम्ही या संदर्भात प्रशासनाकडे या प्रश्‍नाबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे.

वाल्हेकरवाडी मधील स्मशानभूमीची जागा निर्धारित करण्यात आली आहे. महानगरपालिकेने तिथे स्मशानभूमी उभारण्यास अनुकूलता दर्शविली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्येही संबंधित स्थापत्य विभागाचे स्मशानभूमीचे मॉडेल सादरीकरण झाले आहे. तरी मध्ये खूप वेळ निघून गेला आहे. हा वाल्हेकरवाडी स्मशानभूमीचा प्रश्‍न येथील स्थानिक नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. तरी आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर काम सुरु करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, असे या निवेदनात म्हंटले आहे.