स्मशानभूमी विकासास पालिका देणार 50 लाखाचा निधी

0

आयुक्त व महापौर अनुकूल : सर्वसाधारण सभेत मिळणार मंजुरी

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शितळानगर येथील स्मशानभूमीत विविध विकासकामांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने 50 लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली. त्याला महापौर आणि आयुक्तांनी तत्वतः मंजुरी दिली असून, येत्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर करुन घेण्यात येईल, अशी हमी दिल्याची
माहिती खंडेलवाल यांनी दिली.

शितळानगरची वैकुंठ स्मशानभूमी ही मध्यवर्ती ठिकाणी असून, परिसरासाठी एकमेव आहे. बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी येथे आमदार आणि खासदार निधीतून विविध विकासकामे करवून घेतली असून, काही कामे शिल्लक आहेत. मात्र, कॅन्टोन्मेंट
बोर्डाकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे पालिकेने उर्वरित कामांची जबाबदारी घ्यावी, तसेच 50 लाखांचा निधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत खंडेललवाल, बोर्ड सदस्य ललित बालघरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, गटनेते एकनाथ पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ही मागणी रास्त असून, याला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.

सर्वेक्षण स्थापत्यच्या तज्ज्ञ अधिकार्‍याकडून
दरम्यान, या स्मशानभूमीच्या सर्वेक्षणासाठी स्थापत्य विभागाचे आधिकारी पाठवले जातील, सर्वेक्षण करून विकास आराखडा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सिद्धीविनायक नगरी येथील पाणी प्रश्‍नावरही कायम तोडगा काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती विशाल खंडेलवाल यांनी दिली.