‘स्मार्ट ग्राम’ची शौचालये चोरीला

0

चंद्रपूर । उघड्यावर शौचालय बसू नये म्हणून भारत सरकार शौचालय बांधण्यासाठी गावपातळीपासून मोठ्या प्रमाणात मोहिम सुरू केली आहे.‘स्वच्छ भारत अभियान’ या अतर्गत मोठे स्वच्छता अभियान सुरू आहे.मागेल त्याला शौचालय देण्यात येत आहे.त्यासाठी निधी ही उपलब्ध करून देत आहे.यासाठी प्रशासकीय पातळी मोठे अभियान सुरू असतांना मुख्यंमत्र्याच्या विदर्भातील चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पाटण गावातील शौचालय चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिही एक-दोन नव्हे तर तब्बल 112 शौचालये. याबाबत पाटण गावातील महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली आहे आणि आता प्रशासकीय यंत्रणेने चोरांचा शोध घेण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे.चंद्रपुरातील जिवती या दुर्गम तालुक्यातील पाटण हे गाव संपूर्णपणे हगणदारी मुक्त झालेलं गाव आहे. किमान सरकार दरबारी तरी तसा दावा केला जात आहे. या हगणदारीमुक्तीसाठी 2016-2017 चा स्मार्ट ग्रामचा पुरस्कार देखील या गावाला मिळाला आहे.

5 हजाराचे अनुदान मिळाले
शौचालयासाठी खड्डे खोदून निधीची वाट ग्रामस्थ यांना कागदोपत्री प्रत्येक लाभार्थ्याला 5 हजार 100 रुपयांचे अनुदान देखील देण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे गावकर्‍यांना आजही उघड्यावर शौचालयास जावे लागत आहे. एकीकडे सरकार म्हणते की, शौचालये बांधली गेली आहेत आणि दुसरीकडे शौचालयांचा पत्ता काही लागत नाही आहे. म्हणून या गावातील निरक्षर महिलांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. चोरी गेलेली आमची शौचालये मिळवून द्या, अशी त्यांनी रीतसर तक्रार पाटण पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

शौचालयाची खोटी नोंद
पाटण गावात मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.सरकार दरबारी पूर्णपणे हगणदारी मुक्त असलेल्या या गावातील चक्क शौचालयेच चोरीला गेली आहेत.2013-2014 साली या गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने घरी शौचालयाचे खड्डे खोदण्यास सांगितले. लोकांनी त्याप्रमाणे ते खोदले देखील. आज-ना-उद्या सरकारकडून पैसे मिळतील आणि आपण शौचालायचे काम पूर्ण करू या आशेवर लोक दोन वर्षे थांबले. मात्र काहीच होत नसल्याचे पाहून एक दिवस लोकांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. मात्र पंचायत समितीच्या कागदपत्रात पाटण हे पूर्ण गाव शौचालय योजनेसाठी अपात्र असल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. कारण या गावातील प्रत्येक घरी शौचालय बांधले गेल्याची नोंद केली गेली होती.

वापरात प्रमाणपत्रेही दिले
पाटण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करत लाभार्थ्यांना अंधारात ठेऊन निधीचा अपहार केला आणि कागदोपत्री बांधण्यात आलेली शौचालये वापरात असल्याची प्रमाणपत्रेही वरिष्ठांना सादर केली असल्याची या प्रकरणात प्राथमिक माहिती आहे. मात्र शौचालय चोरीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने चंद्रपूरचे जिल्हा प्रशासन हादरले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकार्‍यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.