पुणे । स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यालयासाठी पुणे महापालिकेकडे आर 7 अंतर्गत असणार्या सेनापती बापट रोडवरील आय सी सी टॉवर्समधली जागा भाडे तत्वावर देण्याच्या ठरावाला शुक्रवारी मुख्य सभेने मंजुरी दिली.
पुणे स्मार्ट सिटी कार्यालयासाठी पुणे महापलिकेच्या 2008 च्या कायद्यांतर्गत ताब्यात असलेल्या सेनापती बापट रोडवरील आय सी सी टॉवर्समधील जागा देण्यात यावी, असा प्रस्ताव दिलीप बराटे आणि योगेश समेळ यांनी मांडला होता. हा प्रस्ताव शुक्रवारी मुख्यसभेसमोर मांडण्यात आला. स्मार्ट सिटी ही कंपनी सरकारी नसल्याचा अभिप्राय देण्यात आला. त्यामुळे ही कंपनी सरकारी कंपनीच्या निकषात येत नाही. त्यामुळे या कार्यालयाला महापालिका नियमानुसार भाडे आकारण्यात यावे, अशी मागणी सभासदांकडून करण्यात आली. तशी उपसूचना देखील शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी यावेळी केली. या उपसूचनेसह प्रस्तावला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे स्मार्ट सिटीला सरकारी कंपनी असल्याचा दर्जा मिळत नाही तो पर्यंत नियमानुसार कार्यालयाचे भाडे महापालिकेला भरावे लागणार आहे.