पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्या पिंपरी-चिंचवड शहरातील कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र कचरा कुंड्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सत्ताधारी आणि प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराचा कचरा झाल्यानंतर देखील कच-या सारख्या गहन प्रश्नाकडे प्रशासन आणि सत्ताधारी गांभीर्याने पाहत नसल्याने शहरवासियांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पदाधिकारी करतात काय?
शहराच्या अनेक भागातील कचरा दररोज उचलला जात नाही. कचरा कुंड्या साफ केल्या जात नाहीत. फुटपाथवर कचरा टाकला जातो. दररोज कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. डेंगी, स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला आहे. स्वाईन फ्ल्यूने 31 जणांचा बळी घेतला आहे. तर, डेंगूने महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याच मृत्यू झाला आहे. तरीही, प्रशासन स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सर्वत्र कचर्याचे ढीग
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, निगडी परिसरातील कचरा कुंड्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. कचरा कुंडी दररोज खाली केली जात नाही. त्यामुळे कचरा कुंडी परिसरात कचर्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराचा कचरा झाला आहे. राहण्यायोग्य शहराच्या यादीत देखील औद्योगिकनगरी पिछाडीवर गेली आहे. तरी, देखील ढिम्म प्रशासन आणि कचखाऊ भुमिका घेणारे सत्ताधारी जागे झाले नाहीत. कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. कच-या सारख्या गहन प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सत्ताधार्यांकडून तकलादू कारणे
कचर्याबाबत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत. नगरसेवकांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे. प्रत्येक महिन्याच्या सभेत कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी नगरसेवक महासभेत करतात. तरीही, सत्ताधारी आणि निष्क्रिय प्रशासन कच-याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. कचरा संकलन करणारी वाहने खराब झाल्याची फुटकळ कारणे प्रशासन आणि सत्ताधा-यांकडून दिली जातात. कचरा संकलन करणारी निम्मी वाहने नादुरुस्त झाली आहे. त्याचे आर्युमान संपले असल्याचे सांगितले जाते. वाहने खराब झाली असतील तर वाहने खरेदी करण्यास सत्ताधारी आणि प्रशासनाला कोणी अडविले आहे. कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.