अविनाश म्हाकवेकर-
गेल्या दोन-तीन महिन्यांचा आढावा घेतला, तर पिंपरी-चिंचवडमधील या राजकारण्यांना तुमची ‘यत्ता कंची’ असे विचारण्याची वेळ आली आहे. कारण महापालिकेत डुकर, कुत्रे, घुबड घेवून नगरसेवक येवू लागले आहेत. हे कमी आहे म्हणून की काय आमदार आणि खासदारही बेताल झाले आहेत. ‘शहराचा विकास गेला चुलीत, आपल्या प्रसिध्दीचे ढोल वाजत राहिले पाहिजेत’ असा ‘स्वच्छ हेतू’ सर्वांचा आहे. त्याचमुळे ‘बदनाम ही सही, नाम तो पहचानासा हो गया ना…!’ अशी त्यांची भूमिका आहे. दुर्दैवाने या शहरात अशा वाचाळवीर, बोलभांडांना जाब विचारणारी माणसं किंवा संघटना नाहीत. याचमुळे सगळी वाट लागली आहे.
शहरातील हे राजकारणी सर्वच पक्षातील आहेत. अगदी ‘आम्ही शुचिर्भूत’ असा आव आणणार्या भाजपमध्ये सुध्दा! गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणार्या या लोकप्रतिनिधींचे किमान शिक्षण किंवा थोडेफार वाचन तरी आहे का? याबद्दलच शंका वाटावी, अशी परिस्थिती सध्या आहे. मागील महिन्यात महापलिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी ‘भटकी कुत्री’ या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क एक मोठी पिशवीभरून कुत्र्याची 10-12 पिल्लीच आणली. या घटनेच्या अगोदर सहा दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी डुकरांचा उपद्रव होतो हे दाखविण्यासाठी मोठ्या सॅकमध्ये घालून डुक्कर आणले आणि वैद्यकीय अधिकार्यांच्या टेबलावर आपटले. याच्या पंधरा दिवस आधी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी तर प्राणीसंग्रहालयातून दुर्मीळ घुबडाची तस्करी झाली, असा उगीचच सनसनाटी आरोप केला. बरे झाले, यंदा सभागृहात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही आणि भाजप सत्तेवर आहे. नाहीतर त्यांनीही घोडी, गाढवं, गायी, वळू, पाली, बेडूक सभागृहात आणायला कमी केले नसते. आता प्राण्यांचे हे वर्तुळ पुर्ण होण्यासाठी ‘मनसे’च्या एकमेव सदस्यानेही एखादा प्राणी शोधायला हरकत नाही. निदान बरणीभर मच्छर आणून ती सभागृहात फोडत खळ्ळखट्टक करायला हरकत नाही. तुम्हीतरी का मागे राहता?
कुत्र्याची पिल्ले आणणार्या साने यांना आपले नाव दररोज वृत्तपत्रात यावे असे वाटते. त्यासाठी ते कायम विषय नवा शोधत असतात. विरोधी पक्षनेता म्हणून ते धडाकेबाज काम करतील, असे सुरूवातीला वाटले होते. परंतू कसले काय? ते केवळ पत्रक बहाद्दर ठरले. दररोज एक आरोप! यातुन फलनिष्पत्ती काय? शून्य! वास्तविक सत्ताधार्यांवर त्यांचा अंकुश हवा होता. मात्र, मिळालेल्या पदाचा स्वतःच्या प्रसिध्दीसाठीच ते वापर करुन घेतात हे आता लपून राहिलेले नाही. वास्तविक ते तीन टर्म नगरसेवक आहेत. एखादा विषय मिळाला किंवा शोधला की त्याची चिरफाड करायला हवी. मात्र, प्रसिद्धीसाठी कुत्र्याची पिल्ले आणण्याचा स्टंट त्यांना करावा लागला. याचाच पुढचा भाग तर आणखी मनोरंजक ठरला. कारण लगेच आठवडाभराने झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी आंदोलन म्हणून राष्ट्रवादीच्या इतर काही नगरसेवकांनी आपापल्या घरातील दीड-दोन लाखांची पाळीव कुत्री आणली. विषय भटक्या कुत्र्यांचा आणि आणली पाळीव कुत्री! कशासाठी? तर आपल्या श्रीमंती शौकाचे दर्शन घडविण्यासाठी! आता इतके होवूनही शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न संपला? पावसाळ्यामध्ये त्यांनी खड्ड्यांचे पाठवा आणि रोख बक्षीस घेवून जावा, अशी स्पर्धा राष्ट्रवादीने जनतेसाठी जाहीर घेतली होती. त्याचपद्धतीने आता कुत्र्यांच्या शेपटी आणा आणि बक्षीस मिळवा, असे काही केले नाहीतर आपले नशिब समजायचे.
महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयातून ‘दुर्मीळ घुबडाची तस्करी झाली’ असा सनसनाटी करणार्या मंगला कदम या माजी महापौर आहेत. त्यामुळे त्या तरी गंभीर असतील असे वाटले होते, मात्र संबधीत अधिकार्याने बिनतोड खुलासा केल्यावर ‘घुबड’ या विषयाचा जीवच गेला. तसेच कदम यांना या प्राणीसंग्रहालयातच रस का? याचा सविस्तर उलगडा झाला. वाटले होते दुसर्यादिवशी कदम काहीतरी पुरावा करुन काहीतरी बाहेर काढतील. मात्र तोही एक दिवसाच्या प्रसिद्धीपुरताच ठरला. महापौर पदावेळी त्यांनी मिळविलेली प्रसिद्धी आजवर एकाच्याही वाट्याला आलेली नाही. तरीही त्यांना इतका आटापिटा का करावा वाटतो?
महापालिका निवडणूकीत चारीमुंड्या चीत झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस खवळून उठेल आणि सत्ताधारी भाजपला जेरीस आणेल असे वाटत होते. मात्र, त्यांचा फुसका बार निघाला. सगळी भाजप म्हणजे मुळची राष्ट्रवादीच आहे. सगळे नात्यागोत्यातील आणि महापालिकेतील ठेकेदार कंपन्यातील, बांधकाम व्यवसायातील, इतर उद्योगधंद्यातील भागीदार. त्यामुळे प्रकरणे बाहेर काढून एकमेकाला उघडे करण्यापेक्षा पांघरूण घातल्यास मिळणारी उब अधिक महत्वाची वाटत आहे. शिवसेनेत तर उघड गटबाजी आहे. त्यामुळे ते एकमेकालाच उघडे पाडण्याच्या प्रयत्नात असतात. याच शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश आलेल्या सीमा सावळे यांची अतिशय शिवराळ भाषेतील एक ऑडिओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झाली होती. तुषार कामठे व तुषार हिंगे हे भाजपचे नगरसेवक दोन वेगवेगळ्या प्रकरणात फरारही होते. याच पक्षाचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी महापालिकेच्या औषध फवारणी कर्मचार्याच्या कानाखाली लावल्या. हाच का तो सोवळा पक्ष? शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले वकील आहेत, तरीही त्यांनी सॅकमधून डुक्कर आणले. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार देखील वकील आहेत. मात्र, उड्डाणपुलावर मध्यरात्री वाढदिवस साजरा करणार्या त्यांच्या मुलाला एका महिला पोलिस अधिकार्याने हटकले. याचा त्यांना इतका राग आला की पोलीस आयुक्तांकडे थेट तक्रार करून कारणे दाखवा नोटीस बजावायला लावली.
गेल्या महिन्याभरात मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे व चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आपापसातील वर्तन हाडवैर्यासारखे आहे. दररोज एकमेकावर आरोपांची पत्रकबाजी. हे आरोप विकासकामावरून नव्हे तर प्रतिमा हननाचे. त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेचे जावू दे; पण पक्षाचे प्रतिमा भंजन होते त्याचे काय? मात्र, त्यांना याचे सुतक नाही. वास्तविक नगरसेवक असताना दोघांचेही सख्य होते. परंतू नंतर त्यांच्यात काही वाद झाला. पुढे बारणे खासदार झाले, जगताप आमदार झाले. तरीही त्यांना पदाची प्रतिष्ठा राखता आलेली नाही. ही टीका आता इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे, की चित्रपटात दाखविल्या जाणार्या दोन घराण्यांतील वैर्यासारखे वागतो आहोत याचे भान दोघांकडूनही सुटले आहे. एकाने शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा विषय काढायचा, तर लगेच दुसर्याने आधी तुमच्या प्रभागातील अतिक्रमणे रोखा असा सल्ला द्यायचा. म्हणजे मुळ प्रश्न बाजुलाच. हळूहळू यात वाढ होवून ‘फोटोवाला खासदार’-‘14 वर्षे मुका आमदार’, ‘शहरातील गुंडगिरी पोसली’-‘प्राधीकरणाच्या जागा हडप केल्या’, ‘मी महापालिकेत सत्ता आणली’-‘तुम्हाला तुमच्या प्रभागात नगरसेवक निवडून आणता आला नाही’… असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. याबाबतची पत्रके इतकी सविस्तर असतात, की ती प्रसिद्ध केली तर वृत्तपत्राचे अर्धेपान लागेल. मात्र, असा त्यांचा अनुभव केलेल्या विकासकामाविषयी कधी येत नाही. कामाची माहिती क्वचितच दिली जाते. तीही अगदी त्रोटक! आरोप करताना मात्र दोघांच्याही वाणीला धार येते.
जवाब दो! पिंपरी-चिंचवड शहर आता पूर्वीचे केवळ पाच गावांचे राहिलेले नाही. ते अवाढव्य वाढले आहे. 25 लाख लोकसंख्या होईल. परजिल्हा, परराज्य आणि परदेशातील लोक येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के आहे. तसेच नवमतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या सार्यांना आणि नव्या पिढीला तुमच्या अशा प्रसिद्धीच्या स्टंटशी आणि आरोप-प्रत्यारोपांशी काहीही संबध आहे का? पुरेसे पाणी, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, फेरीवाले मुक्त पदपथ, कायदेशीर प्रवासी रिक्षा सुविधा, गुन्हेगारीमुक्त शहर, साहित्य रसिकता कार्यक्रम….त्यांना हवे आहे की तुमची राजकीय करमणूक?