महापालिकेने नागरिकांच्या सूचना, हरकती यांचा विचार लक्षात घेतला पाहिजे
पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसराचा विकास केला जात आहे. या परिसरातील नवीन विकासकामे करण्यात येणार आहेत. वाहतूक, उद्याने, रस्ते सर्वच ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ-मोठी कामे करण्यात येणार आहेत. ही विकासकामे करताना नागरीकांना आपले मत नोंदविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने स्मार्ट सिटीतील कामे करताना नागरिकांच्या सूचना घेण्यात याव्यात. त्यासाठी जनता दरबार घ्यावेत. त्यातून येणार्या सूचनांचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करावा, अशी मागणी चिंचवड विधानसभा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी महापालिकेकडे केली आहे.
अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत
हे देखील वाचा
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये संदेश नवले यांनी म्हटले आहे की, पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या दोन्ही गावांचा विकास 30 वर्षांपूर्वीच झाला आहे. मात्र, स्मार्ट सिटीतून या दोन्ही गावांच्या विकासाच्या योजना कोणत्या आहेत. सध्या स्मार्ट सिटीमधून पिंपळेगुरव येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरु असून याच प्रकारची कामे पिंपळे सौदागर परिसरात कधी सुरु होणार? गावांमध्ये अनेक सोसायटीमध्ये महापालिका 50 टक्के पाणी देते. त्या सोसायटीमध्ये 100 टक्के पाणी कधी मिळणार? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. जनता दरबार घेवून या प्रश्नांची सोडवणूक करावी. स्मार्ट सिटीतून उद्याने विकसीत करावीत. तसेच पिंपळेसौदागर येथील अनेक रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत न झाल्याने रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून हा प्रश्न देखील सोडवावा.
सूचना, हरकती यांचा विचार
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड या शहराच्या नागरिकीकरणामध्ये प्रचंड वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या या नगरीची आता आय.टी.हब, शिक्षणाचे माहेर, उद्योगनगरी, पर्यटन अशा वेगवेगळ्या आणि नवीन ओळखी या शहराची झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरीकरणात वाढ होते आहे. त्यामुळे बाहेर गावावरून आल्यानंतर त्या नागरिकांना पाणी, रस्ते तसेच अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त ताण महापालिका प्रशासनावर पडतो आहे. त्यामुळे सर्वच काना-कोपर्यांमध्ये मुलभूत सुविधा कशा उपलब्ध होणार, रस्ते कसे प्रगत होणार, पाण्याचा प्रश्न तर दिवसेंदिवस प्रचंड गंभीर होतो आहे. त्यामुळेच या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडविण्यासाठी जनता दरबार घेतला पाहिजे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला याचे गांभीर्य जाणवेल. नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचाही प्राधान्याने उपयोग करून घेतला पाहिजे, असेही यामध्ये नवले यांनी सांगितले आहे.