आजअखेर 84 कोटी मिळाले
पिंपरी-चिंचवड : शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात येणार्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 57 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा 32 कोटी आणि राज्य सरकारचा 16 कोटीचा निधी आहे. तर, आजपर्यंत एकूण 84 कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला असल्याची माहिती, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पाच वर्षांत 750 कोटी
पिंपरी-चिंचवड महापालिकेची केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी या अभियानात तिसर्या टप्प्यात निवड झाली. ही निवड स्पर्धात्मक पद्धतीने झाली आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी पाच वर्षात केंद्र सरकारने 500 कोटी, राज्य सरकारकडून 250 कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. या अभियानाअंतर्गत शहरात प्रकल्प राबविण्याकरिता केंद्र सरकारने सन 2017-18 या आर्थिक वर्षात 16 कोटी रुपयांचा निधी दिला होता. स्मार्ट सिटी अभियानाच्या मार्गदर्शक सुचनानुसार केंद्र शासनाच्या एकूण प्राप्त निधीच्या 50 टक्के रक्कम म्हणजेच आठ कोटी इतका राज्य हिस्ता संबंधित शहरास वितरीत करणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य शासनाने देखील पिंपरी पालिकेला आठ कोटी रुपयांचा निधी दिला होता.
प्रशासकीय खर्च, विविध कामे
आता सन 2018-19 मध्ये केंद्र सरकारने 32 कोटी आणि राज्य सरकारने 16 कोटी रुपयांचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिकेला मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय व कार्यालयीन खर्चासाठी केंद्र शासनाचा सहा कोटी आणि राज्य सरकारचा हिस्सा तीन कोटी मंजूर करण्यात आला आहे, असा एकूण 57 कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीची कामे करण्यासाठी मिळाला आहे, असे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.