स्मार्ट सिटी साकारणार शहरभरात ‘ई-कॉरिडॉर’ प्रकल्प

0

पुणे । स्मार्ट बस स्टॉप, स्मार्ट बस, पाचशे इ-टॉयलेट, दोन हजार स्मार्ट पोल, 500 स्मार्ट डस्ट बिन, स्मार्ट दिशादर्शक, इ-टॉयलेट, स्मार्ट पोल, स्मार्ट डस्ट बिन, मोबाईलसाठी चार्जिंग पाँईंट, ई-बाईकसाठी चार्जिंग पाँईंट आदी सुविधा साकारून शहरात ई-कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. शहरात सुमारे पाचशे स्मार्ट टॉललेट उभारण्यात येणार आहे. या टॉयलेटवर सोलर पॅनल उभारले जाणार आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, ऑटो फ्लशिंग या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरात सुमारे एक हजार स्मार्ट बसस्टॉप उभारण्यात येणार आहेत. हे बसस्टॉप उपलब्ध जागेनुसार डिझाईन केले जाणार आहे. यात प्रामुख्याने येणार्‍या बसची नियोजित वेळ दिली जाणार आहे. त्याठिकाणी प्रवाशांना मोबाईलसाठी चार्जिंग पॉईंट असणार आहे. बसस्टॉपवर जागा असेल तर त्या ठिकाणी ई-किऑक्सही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयही या बसस्टॉपवर असणार आहे. या अंतर्गत काही पीएमपी बसही स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीनशे सिग्नल वाहतुकीच्या अनुषंगाने नियंत्रित
इंटेलिजियंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम ही योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याद्वारे शहरातील सुमारे तीनशे सिग्नल वाहतुकीच्या अनुषंगाने नियंत्रित केले जाणार आहे. ही योजना प्रथमत: सोलापूर रस्ता, नगर रस्ता आणि सेव्हन लव्हज चौक ते गंगाधाम चौक या तीन रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या यशस्वीतेनंतरच ही योजना संपूर्ण शहरात कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली.

समान पाणीपुरवठा योजना शहरभर
समान पाणीपुरवठा योजनेतर्गंत टाकण्यात येणार्‍या ऑप्टिकल फायबर केबल डक्टद्वारे ही योजना राबविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने औंध-बाणेर-बालेवाडी या क्षेत्रासाठी या प्रकल्पाची निर्मिती केली होती. मात्र, हा प्रकल्प संपूर्ण शहरात राबविण्यात आला तर त्याचा फायदा शहरातील सगळ्याच नागरिकांना घेणे शक्य होईल, तसेच या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या समोर येतील. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

क्षेत्र निहाय विकासात हबची जागा
स्मार्ट सिटीकडून बालेवाडी येथील 11 एकर जागेवर ‘ट्रान्झिट हब’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यास गुरुवारी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्वारगेट येथे प्रस्तावित मल्टिमॉडेल हबच्या धर्तीवर हे ट्रान्झिट हब उभारले जाणार असल्याची माहिती संचालक मंडळाचे सदस्य श्रीनाथ भिमाले आणि चेतन तुपे यांनी दिली. त्यानुसार, हा प्रस्ताव आता महापालिकेच्या मुख्यसभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच ‘पीपीपी’ तत्त्वावर हे हब उभारले जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या क्षेत्र निहाय विकासात ही हबची जागा आहे. त्या ठिकाणी सर्व वाहतूक सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी स.नं. 25मधील 11 एकर जागेवर हे हब उभारले जाणार आहे. तेथे सुमारे 21 लाख चौरसफूट बांधकाम असणार आहे.

सुमारे तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे
शहरातील विविध चौकात दोन हजार स्मार्ट पोल उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही, दिशादर्शक, मोबाईल चार्जिंग, जागा असेल तेथे ई-दुचाकींसाठी चार्जिंग पॉईंट दिले जाणार आहेत. या पोलवर सुमारे तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून त्याद्वारे प्रत्येक घडामोड टिपण्याचा प्रयत्न असणार आहे.