पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करून महिलांविषयक बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे संबंध महिलांचा अवमान झाला असून त्यांनी त्वरीत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
तमाम महिलांच्या मातृत्वाचा अपमान…
निवेदनात म्हटले आहे की, शबरीमला मंदीर प्रवेशाचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजतो आहे. भारताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त व बेताल वक्तव्य करुन अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑक्झरवर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शबरीमला मंदिरात प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्या म्हणाल्या, रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन तुम्ही तुमच्या घरी न्याल का, मग देवाच्या मंदिरात त्या अवस्थेत कसे काय जाल, असा प्रश्न उपस्थित करुन देशातील तमाम महिलांचा, मातृत्वाचा व त्यांच्या भावनांचा अपमान केला आहे.
महिलांचा अनादर करणार्यांचा निषेध…
त्या एक महिला असून देखील त्यांनी महिलांचा अनादर केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करुन त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी महिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाच्या गंगा धेंडे, महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा कविता खराडे आदी महिला उपस्थित होत्या.