स्वच्छतागृहे पाडण्याबाबत तयार केलेल्या नियमावलीला हरताळ, अंमलबजावणी व्हावी

0

पुणे । शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या केवळ 30 ते 35 टक्के असताना सध्याची स्वच्छतागृहे तरी पाडण्यात येऊ नयेत, या उद्देशाने महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या कडक नियमावलीला हरताळ फासण्याचे प्रयत्न सुरू असून, ही नियमावली जाहीर होणार नाही, याची ‘विशेष’ काळजी घेण्यात येत आहे. शहरात किमान दोन किलोमीटरच्या अंतरावर सार्वजनिक शौचालय, मुतारी असावे असा नियम आहे. मात्र, दाट लोकसंख्या असलेल्या मध्यवस्तीत सार्वजनिक शौचालये, मुतारींची संख्या लक्षणीय कमी असल्याची प्रतिक्रिया उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, शौचालय, मुतारी पाडण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने धोरण तयार केले असून, त्यानुसारच अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

स्वच्छतागृहे पाडण्याचे अनेक प्रस्ताव
एकीकडे शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता आहे. त्यातच महिलांच्या स्वच्छतागृहांची संख्या अगदीच तुरळक आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, ही कमतरता दूर करण्याऐवजी सध्याचीच सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्याचे अनेक प्रस्ताव महिला बालकल्याण समितीपुढे दाखल झाले होते. ही स्वच्छतागृहे पाडण्यासाठी अनेक माननीयच आग्रही होते.

धोरण ठरविण्याची मागणी
स्वच्छतागृहे पाडण्यासंदर्भातील प्रशासनाने दिलेले अहवालही अनेकदा विसंगत येतात. त्या पार्श्‍वभूमीवर, महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी स्वच्छतागृहे पाडण्यासंदर्भात धोरण ठरविण्याची आवश्यकता असल्याची मागणी सर्वसाधारण सभेत केली होती. त्याबाबत असे धोरण तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास देण्यात आल्या होत्या.

विकास कामांमध्ये अडथळा ठरणारी शौचालये, मुतारी पाडावयाची असल्यास नजीकच्या 50 ते 100 मीटर परिसरात नव्याने बांधण्यात यावीत. जुनी पाडण्यापूर्वी नवीन बांधावीत. मार्केट तथा व्यावसायिक ठिकाणची शौचालये, मुतारी या रस्त्याशेजारील मोकळ्या सार्वजनिक जागेत बांधावीत.
दुरुस्तीच्या कारणाशिवाय शौचालये, मुतारी पाडण्यात येऊ नये. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील झोपडपट्टी, गावठाण आदी ठिकाणी वैयक्तिक शौचालयांची कामे पूर्ण झाल्याच्या प्रस्तावांचा संबंधित महापालिका अधिकार्‍यांनी जागेवर जाऊन पाहणी करावी.
सन 2015-16 या वर्षात शौचालये, मुतारी पाडण्यासाठीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नसल्यास ती करू नये. पाडली असल्यास 50 ते 100 मीटर परिसरात नव्याने बांधावी.
पुरुष, महिला स्वच्छतागृहांची जागा दाखविणारे नकाशे इंटरनेटच्या माध्यमातून क्षेत्रिय कार्यालयांनी उपलब्ध करून द्यावेत.