बारामती । बारामती शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहाचा प्रश्न आजही कायम आहे. प्रभागातील अनेक सार्वजिनक स्वच्छता गृहांची दुरवस्था झाली आहे. काही स्वच्छता गृहांमध्ये पाण्याचा अपव्यव होतो तर काहींमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.बारामती शहराला एक विकसीत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, या शहरातील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा हा प्रश्न नगरपालिका प्रशासनाकडे मांडला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगरसेवक निष्क्रिय असल्याचा फायदा घेऊन पालिका प्रशासन कामे करण्यास टाळाटाळ करीत
असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
टँकरने पाणी पुरवठा
बारामती शहरातील बहुतांश स्वच्छतागृहे अशाच दयनीय अवस्थेत आहेत. या स्वच्छतागृहाला पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने आठवड्यातून एक वेळेस टँकरने पाणी पुरवठा केला जातो. आरोग्य केंद्रालगत प्रभागातील 40 वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन खराब झाली आहे. याबाबत नागरिकांनी लोकप्रतिनिधीकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, लोकप्रतिनिधींकडून ही ड्रेनेज लाईन व्यवस्थित असल्याची उत्तरे देत दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नगरसेवक व पालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव
प्रभागातील नगरसेवक व पालिका प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. काम करताना इतर शहरापेक्षा माझा प्रभाग कसा आहे, हे पाहून काम करण्याची पद्धत रूढ झाली आहे. या बाबीला आळा बसला पाहिजे, तरच नागरिकांना मूलभूत सोयी देणे शक्य असल्याचे मत माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे यांना विचारणा केली असता, लवकरच सार्वजनिक स्वच्छतागृह्मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. आसपास असणारा परिसर स्वच्छ करून घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे.