स्वच्छता दुतांचा हिरमोड, पंतप्रधानांशी वेळेअभावी नाही झाला संवाद

0
भुसावळात चंपारण्य सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
भुसावळ:- देशाचे पंतप्रधान थेट चंपारण्य सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमातून स्वच्छतादूतांशी संपर्क साधणार असल्याने प्रचंड तयारी व अपेक्षा ठेवून गेलेल्या नागरीकांसह मान्यवरांचा मात्र संवाद न झाल्याने चांगलाच हिरमोड झाला. विशेष म्हणजे बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह शताब्दी वर्षाच्या समारोप कार्यक्रमासाठी आयएमए हॉलमध्ये लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था मंगळवारी करण्यात आली होती. देशभरातील निवडक 20 शहरांमधील स्वच्छता दुतांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार होते तर महाराष्ट्रातून केवळ भुसावळ व धुळे या शहरांची निवड झाली होती. धुळ्यात पंतप्रधानांनी संवाद साधला असला तरी भुसावळकरांची मात्र निराशा झाली.
चंपारण्य सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशात सत्याग्रहाची सुरुवात बिहार राज्यातील चंपारण्यातून केली होती या घटनेला शंभर पूर्ण झाली असून एक वर्षापूर्वीच चंपारण्य सत्याग्रह शताब्दी कार्यक्रमाची सुरूवात झाली होती त्याचा समारोप मंगळवारी झाला. तेथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आले. लाईव्ह कार्यक्रमासाठी दूरदर्शनच्या ओबी व्हॅनही येथे सोमवारी रात्रीपासूनच दाखल झाल्या होत्या. चंपारण्य येथे सुरू असलेल्या कार्यक्रमाचे येथे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी राजीव पाटील, गटविकास अधिकारी सुभाष मावळे यांच्यासह मुंबई येथून दूरदर्शनचे आलेले कार्यक्रम अधिकारी निरंजन पाठक व त्यांचे सहकारी असे 12 जणांचे पथक येथे दाखल झाले होते.
भाषण लांबल्याने कोलमडले नियोजन
पंतप्रधान मोदीचे भाषण नियोजीत कार्यक्रमानुसार 12.40 वाजता आटोपायला हवे होते मात्र त्याच वेळी त्यांचे भाषण सुरू झाले ते 1.25 वाजेपर्यत सुरू होते. त्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन कोलमडल्याने भुसावळ येथील स्वच्छतादूतांशी संपर्क साधता आला नही. भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तिन्ही तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच यांना कार्यक्रमास बोलाविण्यात आले होते, मात्र अनेक पदाधिकार्‍यांनी दांडी मारली तर ग्रामसेवक व सरपंच यांचीही अनुपस्थिती होती. आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह पालिकेतील नगरसेवक यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावली होती मात्र अर्धा ते एक तास थांबून ते सुध्दा निघून गेले होते.