पुढील वर्षी होणार्या स्वच्छ भारत अभियानाची तयारी सुरू
तळेगाव दाभाडे : स्वच्छ भारत अभियानामध्ये इंदोर महानगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या महापालिकेमध्ये स्वच्छता विषयक कामांची पाहणी करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्यावतीने अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्माचारी असे 35 जणांचे पथक प्रशिक्षण, पाहणी तसेच अभ्यासासाठी 5 दिवसांच्या इंदोर दौर्यावर जात आहे. 5 दिवसांच्या या दौर्यावर हे पथक 6 ते 10 सप्टेंबर दरम्यान जाणार आहे. स्वच्छ भारत अभियान 2018 मध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा 65 वा क्रमांक आला होता. मोठे परिश्रम घेउनही नगरपरिषदेला अपेक्षित यश लाभले नाही. यावर्षी स्वच्छ भारत अभियान 2019 च्या अभियानाची तयारी व नियोजन करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला असल्याची माहिती, आरोग्य समिती सभापती अरुण भेगडे पाटील यांनी सांगितली.
हे देखील वाचा
या अभ्यासदौर्यात नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्यासह काही नगरसेवक,वरिष्ठ अधिकारी असे 35 जणांचे पथक असेल. प्रशिक्षण, पाहणी तसेच अभ्यासासाठी 5 दिवसांच्या इंदोर दौर्यावर जात आहे. या दौर्यात शहर स्वच्छता, सुंदरता, ओला-सुका कचरा संकलन, विलागीकरण तसेच ओल्या कचर्यापासून खत निर्मिती व त्याचे वितरण तसेच आदर्श उद्याने, बगीचे, शहरातील गोड्या पाण्याचे तलाव, भुयारी गटार योजना, जलशुद्धीकरण योजना, सार्वजनिक शौचालय व त्यास देण्यात येणार्या सोयी-सुविधा याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.
हा दौरा गुरुवारी विशेष लक्झरी बसने सुरु होणार असून 10 तारखेस पूर्ण होणार आहे. दौर्याच्या काळातील प्रवास, निवास, चहापान असा सर्व खर्च नगरपरिषदेच्या मार्फत करण्यात येणार आहे. सहभागी सदस्यांनी जाण्याची तयारी उस्ताहाने सुरु केली आहे. सध्या शहरात प्रतिदिन 20 ते 22 टन ओला-सुका कचरा निर्माण होत असतो. घंटागाड्या व अन्य साधनांमधून घरोघरी जाऊन कचरा गोळा करून तो कचरा डेपोवर आणला जातो. त्या ठिकाणी कचर्यापासून खत निर्मितीची प्रक्रिया केली जाते.