स्वच्छतेच्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन परिसरातील कामांची पाहणी

0

नवी मुंबई । ऐरोली तसेच कोपरखैरणे रेल्वे स्टेशनला भेट देऊन त्याठिकाणी स्वच्छतेकरिता आवश्यक ओला व सुका कचरा टाकण्यासाठी फलाटांवर काही अंतरावर छोट्या कचरा डब्यांची व्यवस्था करणे, रुळांवर शौचास कोणी बसूच नये म्हणून आवश्यक प्रतिबंधक व्यवस्था करणे अशा महत्त्वाच्या बाबींची तातडीने पूर्तता करण्याकरिता महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाच्या अभियंत्यांनी लगेचच एकत्रित पाहणी करून आवश्यक बाबींची त्वरित पूर्तता करावी तसेच आवश्यक दुरुस्ती करावी, असे निर्देश मनपा आयुक्त एन.रामास्वामी यांनी पाहणी वेळी दिले. ऐरोली व कोपरखैरणे बस डेपो येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी करून आयुक्तांनी आतील व बाहेरील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यास तसेच परिसर सुशोभित करण्यास सांगितले.

सार्वजनिक मोकळ्या व मोठ्या भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येत असून त्याची पाहणी त्यांनी केली व शहरात ठिकठिकाणी अशा चित्रभिंती रंगविण्याचे त्यांनी सूचित केले. आयएचएचएल. अंतर्गत बांधण्यात आलेल्या समतानगर ऐरोली व हनुमाननगर कोपरखैरणे येथील शौचालयांची पाहणी करून त्यांनी शौचालय व शौचालय परिसर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचे सूचित केले. शासकीय व महापालिका अनुदानातून घरात बांधलेल्या वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी करून त्यांनी ते कायम वापरात ठेवावेत, असे लाभार्थी नागरिकांना आवाहन केले तसेच तेथील पाण्याच्या सुविधेसाठी आवश्यकता तपासून वैयक्तिक नळजोडण्या देण्यास संबंधित अधिकार्‍यांना सांगितले.

रजिस्टर ठेवण्याच्या सूचना
सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची पाहणी करताना तेथे वापर नोंद तसेच अभिप्राय व सूचनांकरिता रजिस्टर ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.महानगरपालिकेच्या उद्यानांमधींल पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी चिंचोली उद्यान बांधण्यात आलेल्या कम्पोस्टिंग पीटची त्यांनी पाहणी केली तसेच महापे येथील मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो,असे हॉटेल सरोवर पोर्टिको यांनी घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करत कार्यान्वित केलेल्या कम्पोस्टिंग मशीनचीही त्यांनी पाहणी केली.