‘कचर्याची विल्हेवाट’ यावर मार्गदर्शन
पिंपरी : कचर्याची समस्या सर्वत्र असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कचर्याच्या विलगीकरणाबरोबरच पुनर्वापर करणे आवश्क आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यास आपले शहर देशात नव्हे तर सर्व जगात प्रथम क्रमांकाचे होईल. कचर्याच्या विलगीकरणाचे नियोजन योग्यरितीने करावे लागेल. मुलभूत सुविधा देत असताना कचर्याची समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे लागेल, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. ऑटो क्लस्टर येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रभाग कार्यालय व आरोग्य विभाग आणि शहरातल्या विविध संस्था व संघटना यांच्याकरिता घेण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, स्मिता झगडे, आशा राऊत, सर्व प्रभागाचे सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरीक्षक रमेश सरदेसाई, रस्ते व्यवस्थापनाचे आय.एम.मर्चंट, पर्यावरण संवर्धन समितीचे विकास पाटील, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सदस्य पलाश, सुमन शिल्प, सुंदरबन सोसायटीचे सदस्य, क्रिसिलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वच्छतेकडे मिशन म्हणून पहावे
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, स्वच्छतेकडे एक काम म्हणून न पाहता त्याकडे एक मिशन म्हणून पाहिले पाहिजे. स्वच्छता एक मिशन घेऊन काम केल्यास स्वच्छ शहर होण्यास वेळ लागणार नाही. पिंपरी-चिंचवड शहर हे स्वच्छतेबाबतीत अव्वल नंबरचे शहर झाले पाहिजे. शहराच्या स्वच्छतेसाठी अधिकारी-कर्मचारी काम करतातच. परंतु या शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ विविध संस्था, संघटनांनी शहर स्वच्छतेसाठी कार्य करावे. या मिशनसाठी सर्व नागरिकांनी मदत करणे गरजेचे आहे.
नागरिकरण म्हणजे कामकाजाची संधी
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, मागील दशकामध्ये शहराची वाढ 70% झाली असून भविष्यातही ती सातत्याने होत राहणार आहे. कारण शहराचा सर्वांगिण विकास व शहराचे प्लानिंग प्रमाणे ठरविण्यात आलेली विकासाची दिशा यामुळे या शहराकडे येणारा नागरिक आकर्षित झालेला आहे. नागरिकरण ही समस्या म्हणून न पाहता कामकाजाची संधी म्हणून पहावे लागणार आहे. येणार्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शहराच्या विकासासाठी नियोजनबद्ध काम केल्यास विकासाबाबत अडचणी निर्माण होणार नाहीत. शहराची झपाट्याने वाढ होत असल्याने वर्षाला 5 % कचरा वाढणार आहे. यावर उपाय म्हणून कचर्याचे विलगीकरण जागच्या जागी झाले पाहिजे. विलगीकरणानंतर त्यांचे मूल्य वाढते व विल्हेवाट व्यवस्थित केल्यास कचर्याबाबतच्या समस्या सोडविणे सुलभ होईल.
यावेळी प्रमुख वक्ते राजेंद्र सराफ यांनी कचर्याची विल्हेवाट, पुनर्वापर व कचरा निर्मितीच्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन केले. क्रिसीलचे समिर पालपर्थी यांनीही सादरीकरण केले. पलाश सोसायटीच्या स्वाती रोकडे यांनीही अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी मानले.