स्वच्छतेला आद्य कर्तव्य समजून परिवर्तनाची सुरुवात करणे गरजेचे

0

नवापूर । जो पर्यंत गाव स्वच्छ होत नाही तो पर्यंत त्याचा विकासाची सुरुवात होणे शक्य नाही तसेच आरोग्याची पहिली पायरी सुध्दा स्वच्छताच आहे, म्हणून स्वच्छतेला आद्य कर्तव्य समजून परिवर्तनाची सुरुवात केली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. ते तालुक्यातील भादवड गावात भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होते. माता व बाल आरोग्य तसेच किशोरवयीन आरोग्य विषयावर या प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुविधा जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शासन आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवापूर तालुका कुपोषण आणि हागणदारी मुक्त झाले पाहिजे. प्रत्येकानी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छता देखील राखणे अत्यंत महत्वाची आहे. आता तालुक्यातील महिला दागिने विकून शौचालय बांधत आहे त्याचं आदर्श सर्वानी घेतलं पाहिजे. सभापती सविता गावित म्हणाले की समाज बांधवानी कार्यक्रमात आरोग्य व पोषणाच्या संदर्भात विविध माहिती देण्यात आली आहे त्या माहितीचा वापर आपल्या रोजच्या जीवनात उपयोगात आणल्यास तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. बाल विकास प्रकल्प व आरोग्य विभागाच्यावतीने बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमांतर्गत पहिल्या जन्मलेल्या मुलींचे मान्यवरांचा हस्ते स्वागत करण्यात करण्यात आले.

तीन सूत्रीचे पालन करा
यावेळी बोलतांना डॉ कांचन वसावे यांनी गरोदर मातांना आरोग्याची त्रिसूत्रीची माहिती दिली. ते म्हणाले की गरोदर राहिल्या नंतर लवकरात लवकर आरोग्यकेंद्रात नाव नोंदणी, गरोदरपणात किमान पाच वेळा आरोग्य तपासणी आणि आरोग्य केंद्र, दवाखाण्यात प्रसूती या तीन सूत्रीचे पालन केल्यास प्रसूतीवेळी मातांचे तसेच नवजात शिशुंच्या मृत्युचे प्रमाण खूप कमी होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अंबादास यादव यांनी केले.

अधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी मंचावर पंचायत समिती सभापती सविता गावित, पंचायत समिती सदस्य जगन कोकणी, जोहारसिंग नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, क्षेत्रीय प्रचार संचलनालयाचे अधिकारी पराग मांदळे, अंबादास यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजीव वळवी, सरपंच संजीव वळवी, उपसरपंच ताईबाई नाईक, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस व्ही पिंपळसे, डॉ. योगेश वळवी, डॉ कांचन वसावे, डॉ भानुदास गावित, इत्यादी उपस्थित होते.