पुणे । शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना सोबत घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना तसेच जनजागृती करण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांना घरातच कचरा जिरविण्यावर भर द्यावा, यासाठी महापालिका प्रशासन स्वच्छ पुरस्कार देते. आता या स्पर्धेसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. या पुरस्कारांसाठी यापूर्वी 2 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत केवळ 4 अर्जच पालिकेस मिळलेले आहेत. तर देण्यात येणार्या बक्षिसांची संख्या 30 आहे. त्यामुळे किमान बक्षिसांएवढे अर्ज प्राप्त व्हावेत, यासाठी या स्पर्धेसाठी आता 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानाशी हा पुरस्कार संलग्न करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी महापालिकेने त्याची घोषणा केली. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी पुणेकरांना 2 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर 2017 ही मुदत देण्यात आली आहे. मात्र, अवघे 4 अर्ज आल्याने स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नामुष्की ओढावयाला नको, म्हणून हे अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली अहे. या स्पर्धेत 5 हजारांपासून 21 हजार रुपयांपर्यंत असे सुमारे 30 पुरस्कार प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यांची एकूण रक्कम 2 लाख रुपये इतकी असून त्याचे वितरण 26 जानेवारी 2018 ला केले जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर
करण्यात आले.
मुदतीत फक्त 4 अर्ज
या स्पर्धेसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अवघे 4 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अर्जांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच संस्थांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालये तसेच कचरा व्यवस्थापनाशी संबधित संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
– सुरेश जगताप
उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग