हाय टेक इलेक्शन मल्टिसर्व्हीसेस व यशराज एंटरप्रायजेस या करणार काम
महापालिकेकडून दोन खासगी संस्थांची नियुक्ती
पिंपरी : केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणार्या ‘स्वच्छ भारत अभियान 2019’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पिंपरी-चिंचवड महापालिका लाखो रुपयांचा खर्च करणार आहे. या अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक येथील हाय टेक इलेक्शन मल्टिसर्व्हीसेस अँड कंपनी आणि यशराज एंटरप्रायजेस या खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी एजन्सीला प्रत्येकी 22 लाख रुपये याप्रमाणे एकूण 43 लाख 29 हजार 880 रुपये देण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ भारत 2018’ अभियानांतर्गत झालेल्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सर्वात खाली क्रमांक गेला होता. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी यावर्षी महापालिकेकडून जनजागृती ‘आऊटसोर्सिंग’ करणार आहेत.
हे देखील वाचा
फीडबॅक व वोटअपसाठी मार्गदर्शन
केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणार्या ‘स्वच्छ भारत अभियान 2019’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत काही केल्या पहिला क्रमांक मिळत नसल्याने महापालिका प्रशासन ‘सैरभैर’ झाले आहे. त्यामुळे यंदा जनजागृतीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. जनजागृतीसंदर्भातील कामे गेली तीन वर्षे महापालिकेने केली आहेत. यंदा पहिल्यांदाच हे काम खासगी एजन्सीमार्फत करून घेतले जाणार आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे मार्गदर्शन करून स्वच्छ सर्व्हेक्षणाची माहिती दिली जाणार आहे. शहरातील किमान 2 लाख 50 हजार कुटुंबांना ही माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी प्रति कुटूंबाकरिता एजन्सीला 5 रूपये अदा केले जाणार आहेत. नागरिकांच्या घरोघरी जाऊन केंद्र सरकारने विकसित केलेले ‘स्वच्छता’ अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून तक्रार नोंद करणे, फीडबॅक व वोटअप करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गृहसंस्थांमध्ये ‘स्वच्छ मंच’ पोर्टलवर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून घेण्याचे काम एजन्सीला करावे लागणार आहे. किमान 2 लाख 50 हजार नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करण्याची अट आहे. त्यासाठी प्रत्येक मोबाईल धारकांमागे 10 रूपये शुल्क महापालिका एजन्सीला देणार आहे.
स्थायी समितीने दिली मान्यता
शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था व मंडळांकडे माहिती पत्रके वाटणे, चर्चासत्र घडविणे, जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करणे. त्याचा अहवाल, छायाचित्र व सीडी सादर करण्याचे काम एजन्सीला करावे लागणार आहे. एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी 20 प्रमाणे एकूण 160 जनजागृती अभियान घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक अभियानाला 6 हजार रूपये महापालिका देणार आहे. हे काम नाशिक येथील हाय टेक इलेक्शन मल्टि सर्व्हीसेस अॅन्ड कंपनीला देण्यात येणार होते. मूळ ठरावात बदल करत उपसुचनेद्वारे हे हाय टेक इलेक्शन मल्टि सर्व्हीसेस अॅन्ड कंपनी आणि यशराज एंटरप्रायजेस दोन्ही या खासगी एजन्सीला विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दोन्ही एजन्सीला प्रत्येकी 22 लाख रुपये याप्रमाणे 43 लाख 29 हजार 880 रुपये देण्यात येणार असून त्याला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली.