धुळे । स्वच्छ सर्वेक्षण 2018साठी मनपाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मनपाने स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरूवात होण्यापूर्वीच स्वच्छता अॅपच्या रँकिंगमध्ये देशात 20 वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मनपातर्फे 7 नोव्हेंबरपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. मनपाने कचराकुंड्यांचे सर्वेक्षण करण्यासह घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्याची कार्यवाही केली. त्याबाबत कचरा संकलन करणार्या ठेकेदारांची बैठक घेण्यात आली. शिवाय शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्यांनिहाय कार्यवाही करण्यात येत आहे़ स्वच्छ सर्वेक्षणाचाच भाग असलेल्या स्वच्छता अॅपसाठी मनपाला जनजागृती करून 7 हजार अॅपचे लक्ष्य देण्यात आले होते. ते मनपाने पूर्ण केले आहे.