स्वच्छ सर्वेक्षणासाठी जुन्नर पालिका सज्ज

0

नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांची माहिती

जुन्नर : येत्या 4 जानेवारीपासून पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होणार आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली.

यंदा नगरसेवक आणि नागरिकांचा सहभाग स्पर्धेत महत्त्वाचा ठरणार आहे. ‘स्वच्छ व सुंदर शहरा’साठी केंद्र शासनाने मागील वर्षापासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे. स्वच्छ सर्वे क्षणांतर्गत 5 हजार गुणांच्या स्पर्धेत सेवास्तर, कचरा संकलन व वाहतूक, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट, माहिती शिक्षण व संवाद यासह ओडीएफ अर्थात हागणदारीमुक्त पुढील टप्प्यासाठी देखील गुण ठेवण्यात आले आहेत.

ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची मोहीम

ओडीएफ अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यात हागणदारी मुक्तीनंतर पालिकेने काय सुविधा पुरविल्या आहेत. सार्वजनिक शौचालयातील भांडी सुस्थितीत आहेत का? साबण, पाण्याची सुविधा त्याचबरोबर लहान मुले व अपंगांसाठी शौचालय वापर योग्य आहे का? अशी संकल्पना सर्वेक्षणांतर्गत नव्याने पुढे आणण्यात आली असल्याने त्याची अंमलबजावणी पालिकेला करावी लागणार असल्याचे आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री यांनी सांगितले.

तारांकित मानांकनासाठी देखील गुण ठेवले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. स्वच्छता अ‍ॅप, व्यापारी वर्गासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची मोहिम राबविण्यात आली आहे. 2019 च्या सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना सात प्रश्‍न विचारले जाणार आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आमचे शहर अधिक स्वच्छ आहे का? हागणदारीमुक्त, सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे आहेत का? कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविला जातो का? पुरेशा प्रमाणात कचराकुंड्या आहेत का? स्वच्छता कर्मचारी ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्यास सांगतात का? अशा प्रश्‍नांचा यात सामावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत यंदा एलईडी स्क्रिनद्वारे नागरिकांना स्वच्छतेची माहिती दिली जाणार आहे. याचबरोबर चित्रफितीद्वारे तसेच सोशल मीडियातून जनजागृती केली जाणार असल्याचे खत्री यांनी सांगितले.