नवापूर नगर पालिकेतर्फे शहरात 4 जानेवारीपासुन स्वच्छ सर्वेक्षण सुरु झाले असून हे स्वच्छता सर्वेक्षण अभियान 10 मार्च पर्यत चालणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा तो एक भाग असून स्वच्छ सर्वेक्षण 2018 हा केंद्र शासनाचा स्वच्छतेच्या मुल्यांकनाचा उपक्रम आहे. या मुल्यांकन उपक्रमामध्ये नवापूर शहराला उच्चतम गुण प्राप्त करुन स्वच्छतेचा बाबतीत नवापूर शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी नगर पालिकेला नवापूरकरांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र हे अभियान राबवितांना ते केवळ स्पर्धा व अभियाना पुरते मर्यादित राहु नये. हे अभियान खर्या अर्थाने एकजुटीने व मना पासुन राबवणे आवश्यक आहे. व स्वच्छ सुंदर, आरोग्यदायी नवापूरसाठी ते महत्त्वाचे आहे.
नवापूरकरांनी रोज ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन नगर पालिकेचा घंटा गाडीत टाकणे व कचरा इतरत्र टाकू नये या बाबीची कडक अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. जे नागरीक या बाबीची अंमलबजावणी करत नाही त्यांचावर घनकचरा बाबत मंजुर उपविधीतील तरतुदीनुसार नगर पालिके मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. घरात किंवा दुकानात ओला व सुका कचरा वेगवेगळा करणेकामी दोन कचरापेटी ठेवणे आवश्यक आहे.या स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने शहराला स्वच्छता लावण्याची संधी मिळाली आहे. पालिकेने हे अभियान अधिक व्यापक करावे. शहराचा मध्य किंवा सुशिक्षित भागांपेक्षा गोरगरिब व ग्रामीण वस्तीत नियमीत स्वच्छता पुरविण्याची गरज आहे. तरच या अभियानाला महत्व राहणार आहे. बंदिस्त गटारी व स्वच्छ रस्ते ही चांगली बाब दिसून येते बाहेरचे अधिकारी ही स्वच्छता बघून नाव काढतात. मात्र मध्यतंरी नगर पालिकेने हागणदारीमुक्ती साठी पाहीजे तसे प्रयत्न केलेले नाहीत याबाबत जिल्हाधिकारी यांनी ही मागे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती.
नगर पालिकेने कचरा संकुलनातून घन घचरा प्रकल्प तसेच सफाई व सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता ही चांगली बाब केली आहे .मात्र गटारीचे अस्वच्छ पाणी नदीत जाते हे थांबवणे गरजेचे असुन गटारीचे पाणी शुध्द करुन ते रंगावली नदीत सोडण्याचा प्रकल्प आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे देखील आवश्यक आहे. या स्वच्छ सर्वेक्षणात नगर पालिका शहरात वेगवेगळ्या भागात कचरापेटी ठेवणार असून स्वच्छतागृह स्वच्छ करणे व दुरुस्ती करणे हे काम हाती घेणार आहे. या पलिकडे नगर पालिकेने सार्वजनिक स्वच्छता गृहाची संख्या वाढवुन शहराचा मुख्य भागात त्या बांधणे आवश्यक आहे. महिला शौचालयाची संख्या फारच कमी असून शौचालयाची ओरड आहेच, शहरात दाट वस्ती व शहराचा मध्य भागात मुतारी नसल्याने नागरीक नाईलाजावस्त उघड्यावर शौचास बसतात. याबाबत पालिकेने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात शासनाची कमेटी येऊन शहराची पाहणी करणार आहे व मार्क देऊन ग्रेड दिली जाणार आहे. सध्या शहरात स्वच्छतेचे काम नगर पालिकेचा आरोग्य विभाग चांगल्या प्रकारे करत आहे, मात्र स्वच्छ भारत अभियानाचा नारा नगर पालिका लावत असतांना भोई गल्ली व काही भागात दोन दिवसापासून घंटागाडी येत नसल्याची तक्रार होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या नवापूरकरांना ओल्या कचर्यापासुन तयार झालेले हरीत खत 5 रुपये भावाने दिले जात आहे. 800 लोकांनी स्वच्छता अँप डाऊन लोड केले असून नगराध्यक्ष हेमलता पाटील ब्रँडअँम्बेसडर (स्वच्छता दुत) म्हणून काम पाहत आहेत. घंटागाडीद्वारे शहराचा कचरा संकलीत करुन तो कचरा संकलन केंद्रात जमा केला जातो. लहान चिंचपाडा भागात ते युनिट काम करत आहे. कचर्यापासुन खत निर्मीती केली जाते. या अभियानात शहरात कचरापेटी ठेवली जाणार आहे. त्या पाठोपाठ नगर पालिकेने प्रत्येक दुकानात व घरात कचरापेटी वाटप करणे गरजेचे आहे. या सर्वेक्षणाचा निमित्ताने नगर पालिका स्वच्छते बाबत सरसावली असून या माध्यमातुन नवापूरकरांना चांगली सवय लागणार आहे. ती प्रत्येकाने लावुन घेणे आवश्यक आहे. स्वच्छता अभियान राबवित असतांना कोणी ही याचे श्रेय घेऊ नये, स्वच्छतेसाठी फक्त घोषणा व भाषणबाजी न करता ते प्रत्यक्षात राबवणे आवश्यक आहे.
– हेमंत पाटील, नवापूर
9823610627