स्वतःमधील कलागुणांना वेळीच ओळखल्यास निराशा पदरी येत नाही

0

जळगाव । इतरांचे अनुकरण करुन आवड नसलेल्या क्षेत्रात करीअर करण्याचा अनेक विचार करतात. त्या क्षेत्रात करीअरच्या दृष्टीने मार्गक्रमणही करतात मात्र त्या क्षेत्रात स्वतःच्या आवडीनुसार तसेच मनापासून प्रवेश केलेले नसल्याने पदरी निराशा येते. परंतू त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. वेळ निघून गेल्यानंतर पश्‍चताप करण्यापेक्षा योग्य वयात, योग्य वेळी स्वतःमधील कलागुण ओळखून आवडीच्या क्षेत्रात करीअरचा विचार करावा, असे मत मराठी सिनेअभिनेता, कवी, लेखन डॉ.गिरीश ओक यांनी व्यक्त केले. मू.जे.महाविद्यालयात सुरु असलेल्या चैतन्य 2018 वार्षीक स्नेहसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते उपस्थित होते.

जनभावनांचा विचार व्हावा
पत्रकारांनी पद्मावत चित्रपटाविषयी त्यांच्या मताबाबत विचारणा केली असता त्यांनी राज्यघटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यामुळे चित्रपट बनविणे हे देखील एक स्वातंत्र्य आहे. मात्र ऐतिहासिक विषयावर चित्रपट करतांना जनभावनांचा उद्रेक होणार नाही, लोकांच्या संवेदना दुखविल्या जाणार नाही याचा विचार करायला हवे असे मत मांडले. सध्या पद्मावत चित्रपट वादात सापडला आहे मात्र त्याला सेन्सॉर बोर्डाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे या चित्रपटाला विरोध करण्याची गरज नाही. चित्रपट योग्य नसेल तर बघू नका. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हे विरोध करण्याचा मार्ग नाही असेही त्यांनी सांगितले.

प्रयोग कमी मात्र विषय मोठे
मराठी रंगभूमीच्या सद्यस्थितीविषयी विचारले असता डॉ.ओक यांनी मराठी रंगभूमीतील प्रयोगाची संख्या कमी आहे मात्र प्रयोगातील विषय मोठे आहे. मराठी रंगभूमी मोठमोठ्या विषयांना हात घालत आहे. जगातील वास्तव दाखविण्याचे धाडस केवळ मराठी रंगभूमीतूनच होत असल्याचे त्यांनी दाव्याने सांगितले. अभिनय क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यामानाने संघर्ष देखील खूप आहे. मात्र संघर्षाचा विचार न करता स्वतःला झोकून देत काम करत राहण्याचे आवाहन त्यांनी नवकलाकारांना केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. प्रसंगी त्याच्या समवेत प्राचार्य उदय कुलकर्णी, चारुदत्त गोखले, शरद डोंगरे, प्रा.अविनाश काटे, विश्‍वजीत चौधरी आदी उपस्थित होते.

मराठी सिनेक्षेत्रात वास्तव्य
आज मराठीपेक्षा हिंदी भाषेत अधिक मालिका सुरु आहे. आर्थिक स्थिती चांगली असल्याने हिंदी मालिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्यादृष्टीने मराठी मालिकांना अल्पप्रमाणात व्यासपीठ आहे. मात्र वास्तविकतेचा विचार केल्यास मराठी मालिका सरस आहे. कारण हिंदीत वास्तव्यापेक्षा वेगळे दाखविले जाते. मराठीत असे नाही, प्रेक्षकांना काही प्रमाणात तरी वास्तविकता दिसून येते.