स्वत:च्या वाटा शोधून समस्येतून मार्ग काढणे म्हणजे खरे शिक्षण : डॉ. न. म. जोशी

0

पुणे । आज विद्यार्थ्यांना शिक्षणातील सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. शिक्षणासाठी सहजरित्या प्रवेश मिळतात, परंतु शिक्षण क्षेत्रातच सर्व गोष्टी सोप्या झाल्या तर पुढील आयुष्यात येणार्‍या अडचणींशी दोन हात करायला मुले केव्हा शिकणार? त्यामुळे मुलांना सर्व गोष्टी सोप्या करून देऊ नका. स्वत:च्या वाटा स्वत: शोधून येणार्‍या समस्येतून यशस्वीपणे मार्ग काढणे आणि त्यातून पुढे जाणे म्हणजेच खरे शिक्षण, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. दीपक बोधनी लिखित ‘कस्तुरी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. एरंडवणा येथील मनोहर मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, लेखक दीपक बोधनी, शब्दस्नेह प्रकाशनच्या संचालिका स्नेहलता छत्रे, नीलिमा बोधनी आदी उपस्थित होते.

शिक्षणामुळे सकारात्मक परिवर्तन
शिक्षणातून आपल्यातील सहज प्रवृत्तींचे उदात्तीकरण केले पाहिजे. ज्याचे उदात्तीकरण होत नाही तो मानवस्थितीकडून दानवाकडे वळतो आणि ज्याचे उदात्तीकरण होते तो मानवाकडून देवत्वाकडे वळतो. शिक्षण घेत असताना माणसाच्या वागण्यात सकारात्मक परिवर्तन झाले की तो शिक्षणाच्या पूर्णत्वाकडे येतो, असे डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.

पुस्तकातून समस्यांचे निराकरण
समाजात चांगल्या गोष्टी उशिरा आणि वाईट गोष्टी खूप लवकर समोर येतात. युवकांना सद्भावनेने पुढे आणण्यासाठी कस्तुरी या मार्गदर्शनपर पुस्तकाचा खूप उपयोग होणार आहे, असे डॉ. अ. ल. देशमुख यांनी सांगितले. शाळेनंतर महाविद्यालयीन जीवनापासून ते नोकरी-व्यवसायापर्यंत तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक लिहील्याचे दीपक बोधनी यांनी सांगितले. अनेक वर्षे सामाजिक संस्थेत काम करीत असताना तरुणाईसाठी अनेक उपक्रम व प्रकल्पावर काम केले. त्यावेळी त्यांचे प्रश्‍न आणि समस्या जवळून समजून घेता आल्या. या समस्यांचे निराकरण पुस्तकातून करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. राजेंद्र उत्तुरकर यांनी सूत्रसंचालन केले.