स्वप्ना साखळकरच्या एकाच चढाईने सामना फिरवला

0

ठाणे । एकाच चढाईत तब्बल पाच गुणांची कमाई करत सामन्याचे चित्र पालटवून टाकणार्‍या स्वप्ना साखळकरच्या आक्रमक चढायांनी मित्तल स्पोर्ट्स आयोजित रुपचंद हालोजी थळे स्मृतीचषक ठाणे जिल्हा कबड्डी प्रिमिअर लीगचा पहिला दिवस गाजला. स्वप्नाने मिळवलेल्या पाच गुणांच्या जोरावर अश्‍वमेध संघाने पुजा स्विट्स संघाचा 31-30 असा पराभव करत लीगमधील पहिल्या विजयाची नोंद केली. माधुरी गवंडी आणि अक्शता मसुरकरच्या आक्रमक खेळामुळे पुजा स्विट्स संघाने सुरुावतीपासून सामन्यावर वर्चस्व मिळवले होते.

मध्यतंराला पुजा स्विट्स संघाकडे 14-13 अशी आघाडी होती. सामन्यातील शेवटच्या मिनीटांमध्ये पुजा स्विट्स संघाकडे 30-27 अशी आघाडी असल्यामुळे ते बाजी मारणार असे वाटत होते. पण स्वप्नाच्या एका चढाईने सामन्याचा निकाल बदलवून टाकला. अन्य लढतीत तुलसा वॉरिअर्स संघाने धर्मविर पॅथरचा 35-27 असा पराभव केला. प्रशांत जाधवच्या चढाया आणि सुनील शिवतरकर, सूरज बनसोडे यांच्या मजबुत पकडींच्या जोरावर तुलसा वॉरिअर्स सामन्याच्या पहिल्या सत्रात 19-16 अशी समाधानकारक आघाडी मिळवली होती. दुसर्‍या सत्रात ही आघाडी कायम राखत तुलसा वॉरिअर्स संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभूत संघाच्या परेश म्हात्रेने एकाकी लढत दिली. सामन्याच्या पहिल्या सत्रात 20-8 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या माहेश्‍वर जंपर्स संघाला यश मिळवण्यासाठी मात्र दुसर्‍या सत्रात कडव्या लढतीला सामोरे जावे लागले.