क्रीडा शिक्षक बनला तोतया माध्यमिक शिक्षणाधिकारी ; गुन्हे दाखल करण्याची भीमज्योत शेजवळांची मागणी
भुसावळ (गणेश वाघ)- गणवेश घोटाळा, बुरशीयुक्त शेवया प्रकरण, निकृष्ट पोषण आहार, अपंग युनिट घोटाळा, निकृष्ट बंधारे आदी प्रकरणांमुळे जिल्हा परीषदेची राज्यभरात नाचक्की झाल्यानंतर किमान आतातरी घोटाळ्यांची मालिका थांबेल, अशी अपेक्षा असताना जिल्हा परीषद व नगरपालिका शाळांमध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान अंतर्गत नववी-दहावीच्या विद्यार्थिनींना देण्यात येणार्या स्वयंसिद्धा स्वरंक्षण प्रशिक्षण घोटाळा उघड झाला असून या माध्यमातून प्रशिक्षण न देताच लाखो रुपयांचा निधी हडपण्यात आल्याची तक्रार भुसावळातील कराटे प्रशिक्षक भीमज्योत शेजवळ यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे केली आहे. माहिती अधिकारात अनेक गोपनीय बाबी त्यांच्या हाती लागल्या असून त्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांच्या स्वाक्षरीविनाच बनावट लेटरहेडचा वापर करून मुख्याध्यापकांकडून धनादेश लाटण्यात आल्याची बाबही उघडकीस आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह वरीष्ठ अधिकारी आता याबाबत काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.
बनावट लेटरहेडचा वापर करून लाटला निधी
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान अंतर्गत नववी-दहावीच्या विद्यार्थिनींना वर्ष 2015 पासून स्वयंसिद्धा स्वरंक्षण प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षकाला पाच हजारांचे मानधन तर अन्य खर्चासाठी चार हजार अशी एकूण नऊ हजार खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हा परीषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळेच्या खात्यावर दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नऊ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे वर्ग केली जाते मात्र यंदा 2017-18 चा निधी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जमा न करता मार्च महिन्याच्या अखेरीस जमा करण्यात आला. विशेष म्हणजे दहावीची फेब्रुवारीत परीक्षा असल्याने विद्यार्थिनींना जानेवारीतच निरोप दिला जातो त्यामुळे प्रशिक्षण केव्हा, कसे व कुठे झाले? हे सारेच गौडबंगाल आहे. तक्रारदार शेजवळ यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हाभरात स्वयंसिद्धा प्रशिक्षणाचे धडे विद्यार्थिनींना देण्यातच आलेले नाही तर कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून निधी लाटण्यात आला आहे. या प्रकारात शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक गोपाळ जोनवाल, प्रेमलता गोपाळ जोनवाल यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप असून उभयतांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्यांच्या नावाचे बनावट दस्तावेजाचा (ज्यावर अधिकार्यांची स्वाक्षरी तसेच आवक, जावक क्रमांक नाही) वापर केल्याचा आरोप शेजवळ यांनी केला आहे. शेजवळ यांना उपशिक्षणाधिकारी नेतकर यांनी दिलेल्या पत्रानुसार मुख्याध्यापक हे प्रशिक्षकांची परस्पर नेमणूक करीत असल्याचे कळवण्यात आले आहे त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांचा नावाचा गैरवापर झाल्याने शिक्षण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी आता काय दखल घेतात? याकडे लक्ष लागले आहे.