विश्रांतवाडी । स्वरसाधना सामाजिक रंगमंच आणि काळभैरव प्रतिष्ठान यांच्येतर्फे सुप्रसिद्ध गायक स्व. मोहम्मद रफी यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त यादों के झरोकोंसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या संगीतरजनीच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ हा सामाजिक संदेश देण्यात आला. स्वरसाधना रंगमंचाचे उपाध्यक्ष अॅड. पी.टी. जगदाळे आणि सचिव विजय रणावरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला या कार्यक्रमाला संदेश व आशय यांच्या सादरीकरणाला रसिकांची चांगली दाद मिळाली.
यावेळी एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन करणार्या व मुलीला मुलगा मानून तिला चांगलं शिक्षण देणार्या 8 दांपत्यांना संस्थेचे अध्यक्ष अतुल लोंढे यांच्या हस्ते सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच एका अंध-अपंग निराधार मुलीला नगरसेविका अनिता कदम आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी आर्थिक मदत देऊन त्या मुलीला सन्मानित केले. यावेळी स्वरसाधना संस्थेचे गायक कलाकार अॅड. पी.टी. जगदाळे व त्यांची मुलगी किरण जगदाळे-सावंत यांनी सादर केलेल्या ‘बाप-बेटी की अनोखी पेशकश’ या सांगितिक कार्यक्रमात सचिव विजय रणावरे, विजय वाघमारे, भगीरथ साकळे आदी गायकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी इकबाल दरबार, माणिक बजाज, रामदास गायकवाड, व इतर संगीतप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते. अॅड. जगदाळे यांनी आभार मानले.