स्वराज्य आहे पण सुराज्य बनवणारी पिढी घडायला हवी

0

पुणे । आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, हे ओळखून एमआयटीने तंत्रज्ञानावर भर देत 35 वर्षांचा टप्पा गाठला. सोबतच विज्ञानाविषयी आस्था, देशाविषयीचे प्रेम आणि अध्यात्माची साथ घेऊन हा प्रवास सुरू आहे. आजच्या स्वराज्याला सुराज्य बनवणारी पिढी नक्कीच या संस्थेतून घडेल, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहातर्फे एमआयटीचा 35 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून टिळक बोलत होत्या. माईस एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाश जोशी, प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुनिल कराड आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

कर्मचार्‍यांचा गौरव
संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्‍या दहा कर्मचार्‍यांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रा. प्रकाश माईणकर, पांडुरंग कदम, प्रा. महेश चोपडे, प्रा. अमर मोरे, दयानंद घंटे, डॉ. रोहिणी गायकवाड, गिरीश दाते, नागनाथ सानप, बी. संगप्पा यांना ‘एमआयटी फाउंडेशन डे’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

तंत्रज्ञानामुळे आपण प्रगती पथावर पोहचलो आहोत. मात्र याच तंत्रज्ञानामुळे भारतासह अनेक देशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचा विचार करून एमआयटीने अध्यात्माची सोबत धरली आहे. आपल्याला घडविण्यात आपल्या पालकांचा जितका वाटा असतो, तितकाच किंबहुना त्याहून कित्येकपटीने जास्त शिक्षकांचा व पर्यायाने संस्थेचा असतो, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले.

आदर्शाची उज्ज्वल परंपरा
भारताला आदर्शाची उज्ज्वल परंपरा आहे. त्या परंपरांचा येथे आदर आणि अनुकरणही होते. स्वामी विवेकानंदांनी जे शब्द भारत भूमीबद्दल काढले होते, ते शब्द सत्यात उतरवण्यासाठी सर्वांचेच योगदान गरजेचे आहे, असे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षिरसागर यांनी आभार मानले.