जैत रे जैत या चित्रपटाला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वेला यंदाचा पुरस्कार जाहीर
मुंबई : मराठी भाषेचा उंबरठा ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणार्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणार्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2018 हा स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व 40 वर्ष पूर्ण केलेल्या जैत रे जैत या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसेच स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार 2018 हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुंबई पुणे मुंबई-3 या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला प्रदान करण्यात येणार आहे.
शनिवार, 15 डिसेंबर 2018 रोजी रात्री 8:30 वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार्या या पुरस्कार सोहळ्यात जैत रे जैत चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या जैत रे जैत आणि उंबरठा या चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार असून पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत अस्मिता हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या जैत रे जैत आणि उंबरठा या दोन चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत. याला संगीत संयोजन आनंद सहस्त्रबुद्धे यांचे असणार आहे.
स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. यांच धर्तीवर स्मिता पाटीलचे चाहते या नात्याने तीच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा या हेतूने विलेपार्लेचे आमदार अॅड. पराग अळवणी, आर्च एंटरटेनमेंटचे विनीत आणि अर्चना गोरे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि स्मिताची जवळची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी एकत्र येऊन स्मिताच्या 31 व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने 2017 सालापासून तसेच पुढील प्रत्येक वर्षी स्मिता पाटील पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते.
पहिला स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार 2017 हा ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार 2017 अभिनेत्री अमृता सुभाष यांना देण्यात आला होता.