पुणे । ‘होली कैसन कैसे खेलू’मधून गोपिकांचा प्रकट होणारा विरह… ‘चलो सखी कन्हैया संग खेले होली’ यातून कृष्णासोबत होळी खेळण्याचा झालेला आनंद… मांज खमाज रागातील ‘सावरे ऐजय्यो’च्या सादरीकरणातून पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची रंगलेली मैफल… त्यानंतर राहुल देशपांडे यांच्या मारूबिहाग रागातील विलंबित एकताल बंदिशीने शनिवारची सायंकाळ स्वरमयी झाली. स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे! पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन आणि राहुल देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने या महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन झाले. सहकारनगर येथील सातव सभागृहात झालेल्या या महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. याप्रसंगी गायक अमोल निसळ, गझलकार रमण रणदिवे, ऍना कंस्ट्रक्शनचे अर्चिस अन्नछत्रे व प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा, समीर यार्दी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शास्त्रीय संगीताचे संवर्धन
स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते. यंदा हा स्वरोत्सव दोन दिवसांचा करण्यात आल्याचे स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी सांगितले. निवेदन मधुरा ओक-गद्रे यांनी केले.
बहारदार गायन; श्रोते मंत्रमुग्ध
पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी यमन रागात विलंबित बंदिश- तीनताल, द्रुत बंदिश तीनही सप्तकावर अतिशय सुरेलपणे सादर करीत स्वरानुभूती दिली. त्यांना तबल्यावर निलेश रणदिवे, तर व्हायोलिनवर सविता सुपनेकर यांनी साथसंगत केली. राहुल देशपांडे यांनी विविध आलाप आणि ताना यांचा मिलापात बहारदार गायन करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या बंदीशी सादर केल्या. ’उनहीसे जाओ कहो मोरे मन की बिथा’ सादर करीत सभागृह खिळवून ठेवले. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, हार्मोनियमवर राहुल गोळे, तानपुर्यावर अदिती कुलकर्णी आणि निमिष उत्पात यांनी साथसंगत केली.