भुसावळ। दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना ईपॉस मशिनद्वारे धान्य वितरीत होत असल्याने सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचे आधार लिकींग झाले आहे. किंवा नाही हे आपल्या स्वस्त: धान्य दुकानदाराकडे जाऊन खात्री करुन घ्यावी, अन्यथा आपले आधार, गॅस कनेक्शन, बँक पासबुकची प्रत लवकरात लवकर आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे जमा करण्यात यावी असे आवाहन निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी केले.
कंपनीच्या अभियंत्यामार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण
येथील तहसिल कार्यालयात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ईपॉस मशिनचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तायडे बोलत होते. याप्रसंगी पुरवठा तपासणी अधिकारी आर.एल. राठोड, पुरवठा निरीक्षक एम.एफ तडवी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यशाळेत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना ओवायएसवायएस कंपनीच्या अभियंत्यामार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप
यावेळी 121 स्वस्त धान्य दुकानदारांना मशिन वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार तायडे यांनी सांगितले की, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने राज्यातील जनतेला बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
दुकानात बसणार मशिन
या प्रकल्पाअंतर्गत आधार कार्ड क्रमांकाद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवून धान्यवाटप करण्यात येते त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. याकरीता प्रत्येक दुकानात पाँईंट ऑफ सेल मशिन बसविण्यात येणार असून यामुळे लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या उपकरणाद्वारे बायोमेट्रीक पध्दतीने ओळख पटवून धान्य देण्याची व्यवस्था होणार आहे. येत्या काही दिवसातच ही यंत्रणा सर्व ठिकाणी बसविण्यात येणार आहे. गरजू लाभार्थीपर्यंत धान्य पोहचावे आणि रेशन धान्य वितरणात होणार्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड दिले नाही ते स्वस्त धान्यापासून वंचित राहतील. तसे न झाल्यास ते स्वत: जबाबदार राहतील अशी माहिती तायडे यांनी यावेळी दिली.