रावेर तहसीलसमोर सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेचे लाक्षणिक धरणे आंदोलन
रावेर- शासनाकडून रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख सबसिडी योजनेच्या निर्णयाविरोधात रावेर तालुक्यातील सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेकडून सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार कविता देशमुख यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, 21 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णय (डीबीटी) धान्याऐवजी लाभार्थ्यांना रोख सबसिडी देण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा, राज्यभरातील सर्व शिधापत्रिका धारकांना पुरेसे धान्य उपलब्ध करावे, केरोसीन बंद आहे ते पुन्हा पूर्ववत सुरू करावे, स्वस्त धान्य दुकानदार यांना दरमहा 30 हजार रुपये मानधन करावे यांच्यासह अनेक मागण्यांसाठी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील, उपाध्यक्ष दिनेश महाजन, विलास चौधरी, विठ्ठल पाटील, देविदास महाजन, के.एस.शिंदे, मोहन महाजन, नारायण लोणारी, दिनेश साबळे, किशोर पाटील, सुरेश वाणी, प्रशांत वाणी यांच्यासह तालुक्यातील सुमारे शंभर रेशन दुकानदार उपस्थित होते.
गरीब महिलांमध्ये संताप
तालुक्यात हजारो परीवार शासनाच्या रेशन दुकानांमधून मिळणार्या गहू, तांदुळावर उदरनिर्वाह करतात. एकीकडे झपाट्याने वाढणारी महागाई त्यात ग्रामीण भागात संपलेला रोजगार आणि शासनाकडून रेशनदुकानांवरील धान्य बंद करून दरमहा सबसिडी देण्याचा निर्णय यामुळे अनेक गरीब कुटुंबातील गृहिणी भाजप सरकार विरोधात चिडलेल्या असून धान्य बंद केल्यास पोटाची खळगी कशी भरावी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.