मुंबईत काढणार मोर्चा
पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी 1 एप्रिल रोजी संप पुकारला आहे. सर्व स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवून मुंबईमध्ये आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी 1 लाख दुकानदार यावेळी मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर व ऑल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पुष्कराज देशमुख यांनी सांगितले. दोन्ही संघटनेच्या सभासदांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. तसेच कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे ठरविले असल्याचे बाबर यांनी सांगितले.
संप न होऊ देण्यासाठी प्रयत्न सुरू
देशमुख म्हणाले की, या दोन्ही संघटनांचे 1 लाख स्वस्त धान्य दुकानदार आझाद मैदानावर जमा होणार आहेत. मात्र या दुकानदारांनी मुंबईला येऊ नये, यासाठी राज्य सरकारने सचिवांमार्फत डी. एस. ओ., तहसीलदार, अन्न-धान्य वितरण अधिकारी यांना शासनामार्फत परिपत्रक काढून मोर्च्यात सहभागी होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तरीही दुकानदार कोणत्याही कार्यवाहीला न घाबरता सर्वजण उपस्थित राहणार आहेत. पेपर व व्हॉटस्अपद्वारे संप स्थगित केला आहे. अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे सर्व नेते तसेच इतर संघटनांनीसुद्धा पाठींबा जाहीर केला आहे.