स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानीविरोधत शिवसेनेचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन

0

तहसीलदारांना निवेदन : अनियमित धान्य मिळणार्‍या नागरीकांनी शिवसेनेशी संपर्क करावा- बबलू बर्‍हाटे

भुसावळ- महागाईचा भडका दिवसागणिक वाढत असताना दुसरीकडे गोर-गरीबांना सरकारकडून देण्यात येणारे धान्य दिले जात नसल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी तहसील कार्यालयात ठिय्या मांडत तहसील प्रशासनाला जाब विचारला. प्रसंगी प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने गोर-गरीबांना धान्य न दिल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा अल्टीमेटमही देण्यात आला. गरीबांना धान्य मिळत नसल्याने त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना दक्षिण विभागाचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे बबलू बर्‍हाटे यांनी केले आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांची मुजोरी वाढली
गणेशोत्सव, दसरा, दिवाळीचा सण तोंडावर असताना स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्याबाबत नकारघंटा वाजवली जात आहे. ज्या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत त्याला तिलांजली देऊन आपल्या सोयीप्रमाणे दुकाने उघडण्याचे मनमानी धोरण राबवले जात आहे. परीणामी दुकानदारांची वाट पाहण्याची वेळ सामान्य लाभार्थीवर आली आहे. रीकाम्या हाती परत गेलेल्या लाभार्थ्यांनी दुकानदारांशी संपर्क साधल्यास तुम्ही वेळेत आले नाहीत म्हणून धान्य परत गेले, अशी उत्तरेही देऊन ग्राहकांना माघारी पाठवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही लोक मागील 30 वर्षांपासून धान्य घेत असून अचानक त्यांची नावे यादीतून वगळून टाकण्यात आली तर दुकानदाराने बदल केल्याने त्यांना धान्य मिळत नाही. ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना चढ्या दराने जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत. या अडचणींमध्ये स्वस्त धान्य दुकानांच्या अनागोंदी कारभाराची भर पडत आहे. शासनाच्या परीपत्रकाप्रमाणे नागरिकांच्या सुविधेसाठी शहरातील स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास दुपारनंतर चार तास तसेच ज्या ठिकाणी आठवडे बाजार आहे तेथे पूर्णवेळ दुकाने खुली ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्याचा नियम आहे मात्र शहरातील बहुतांश रेशन दुकानदार नागरीकांच्या अडचणी वा कोणत्याही कारवाईची भीती बाळगता सवडीनुसार दुकाने सुरू ठेवत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.

तर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
ऐन सणासुदीच्या काळात नागरीकांना होणार्‍या अडचणींबाबत पुरवठा विभागाने या दुकानांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भुसावळ शिवसेना दक्षिण विभागातर्फे तहसील प्रशासनाला करण्यात आली. अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे उपतालुका प्रमुख पप्पू बारसे तसेच शिवसेना व सर्व अंगीकृत संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. तक्रारदार नागरीकांच्या तक्रारी वेळेत सोडवल्या जातील असे आश्वासन तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. अनियमित धान्य वितरण किंवा अन्य कोणत्याही तक्रारी असल्यास नागरीकांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क करावा असे आवाहन शिवसेना दक्षिण विभागाचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केले आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी उपतालुका प्रमुख पप्पू बारसे, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षक कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, व्यापारी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अब्रार ठाकरे, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख हेमंत बर्‍हाटे, युवासेना शहर सरचिटनीस सुरज पाटील, राकेश चौधरी, फिरोज तडवी, जवाहर गौर, नबी पटेल, हर्षल चौधरी, अथर्व जोशी, मनीष महाजन, सचिन चौधरी, तेजस तिवारी, खेमचंद लोखंडे उपस्थित होते.