पुणे : स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अतिजोखमीच्या रुग्णांना महापालिकेकडून स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. मात्र, याबाबत महापालिकेच्या रुग्णालये तसेच दवाखान्यांमधील डॉक्टरांकडून जनजागृती केली जात नसल्याचे समोर आले आहे. या लसीकरणासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांत तब्बल 10 हजार 21 लस उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात 8 हजार 775 जणांचेच लसीकरण झाले आहे. त्यामुळे तातडीने जनजागृती मोहीम राबवून लसीकरण मोहीम सक्षमपणे राबविण्याचे आदेश महापालिकेच्या
सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिले आहेत.
प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण तपासणीसाठीआलेले असतानाच त्यांचे प्रबोधन करून ही लस देणे आवश्यक आहे. कारण, या व्यक्तींना स्वाइन फ्लूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, गर्भवती महिला (दुसर्या व तिसर्या तिमाहीतील) यांच्यासह, इतर दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यांसाठी महापालिकेने 2017- 18 आणि 18-19 मधे सुमारे 10 हजार 21 लस खरेदी केल्या होत्या. मात्र, 2017 मध्ये 2 हजार 831 तर 2018 मध्ये 5 हजार 944 अशा सुमारे 8 हजार 775 लसच वापरण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या लसीबाबत तातडीने जनजागृती मोहीम राबवून लसीकरण प्रभावीपणे राबविण्याचे आदेश डॉ. साबणे यांनी दिले आहेत.