स्वाईन फ्लूचा आणखी एक बळी!

0

पिंपरी-चिंचवड : स्वाईन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान, मारुंजी (जि. पुणे) येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यामुळे स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 28 वर गेली आहे. स्वाईन फ्लूची साथ नियंत्रणात यावी, यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर जनजागृती केली जात आहे. स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक तो औषधीसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, तरीही स्वाईन फ्लूची साथ आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे. स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सहा महिन्यात 231 जणांना लागण
पुणे जिल्ह्यातील मारुंजी येथील एका रुग्णाला पाच ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर होऊन सोमवार (दि. 7) रोजी त्याचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यांपासून ’स्वाईन फ्लू’ने ठाण मांडले आहे. गेल्या सहा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांत 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील सहा महिन्यात शहरातील 231 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सध्या 45 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 28 रुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे.