स्वागतयात्रा, सुरेल गीतांनी मराठी नववर्षाचा जल्लोष

0

श्रीराम मंदिर संस्थान, संस्कार भारतीतर्फे विविध कार्यक्रम ; वृक्षारोपण, तपासणी शिबिरातून गुढीपाडवा साजरा शाळा, संस्था तसेच संघटनांतर्फे विविध कार्यक्रम

जळगाव- शहरातील विविध संघटना, संस्था, शाळा तसेच महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रमांव्दारे गुढीपाडवा तसेच मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे विविध पंथ, संप्रदाय, सामाजिक संस्था, भजनी मंडळे, विविध मंदिरे व धर्मप्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून स्वागतयात्रा काढण्यात आली. तर संस्कार भारतीच्या पाडवा पहाटमुळे सुरेल स्वरांनी मराठी नववर्षाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. केसीई संस्थेच्या प.वी. पाटील प्राथमिक विद्यालयातर्फे मतदानाच्या जागृतीसाठी मतदानाचे घोषवाक्य असलेली मतदानाची गुढी उभारण्यात आली. त्याचप्रमाणे संघर्ष अपंग बहुद्देशीय संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात येवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शोभायात्रेतून पाणी बचत, व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश
हिंदू नववर्षानिमित्ताने (गुढीपाडवा) शनिवारी स्वागतयात्रा काढण्यात आली. तर जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज भक्त सेवा मंडळ व गणानाम सत्संग परिवार यांच्यातर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत यात्रा व शोभायात्रेतून पाणी बचतीचा व व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फेचे स्वागतयात्रा काढायचे हे 15वे होते. स्वागतयात्रेची सुरुवात विसनजीनगरातील पंचमुखी गणपती मंदिरातून सकाळी 7.30 वाजता झाली. या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते गायत्री मातेची आरती करण्यात आली. यात्रेच्या शुभारंभावेळी शहर केमिस्ट संघटनेचे सुनील भंगाळे, मुकुंद महाराज, गजू तांबट, योगेश कासार, अजय गांधी, अशोक जोशी, अशोक वाघ आदी उपस्थित होते. शोभायात्रेच्या प्रारंभी भगवा ध्वज, वाद्य, लेझीम पथक, विविध पंथ, संस्थांचे कार्यकर्ते आदींचा समावेश होता. स्वागतयात्रेत पालखीत प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, संत अप्पा महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. स्वागत यात्रा रथ चौकात आल्यावर येथे उभारलेल्या गावगुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ही स्वागतयात्रा गावगुढीसह श्रीराम मंदिरात आली. या वेळी आमदार सुरेश भोळे, पोलिस पाटील प्रभाकर पाटील, दीपक जोशी, चेतन संकेत, धुडकू सपकाळे, दीपक घाणेकर आदी उपस्थित होते.

विविध मार्गात झाले यात्रेचे स्वागत …
गायत्री मंदिरापासून सुरू झालेल्या स्वागतयात्रेचे मार्गात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. ही स्वागतयात्रा इंडो-अमेरिकन रिसर्च सेंटरच्या गल्लीतून विसनजीनगर, बँक स्ट्रिटमार्गे जयप्रकाश नारायण चौक, शास्त्री टॉवर, शहर पोलिस स्टेशन, घाणेकर चौक, आझाद चौक, बळीरामपेठ, शिवाजी चौकमार्गे बळीराम मंदिर, चौबे शाळामार्गाने पुढे ही स्वागतयात्रा सुभाष चौक, सराफ बाजारातून या स्वागतयात्रेची सांगता करण्यात आली.

संस्कारच्या भारतीतर्फे सुरेल सुरांनी सजली पहाट
संस्कार भारतीतर्फे यंदाची गुढी नदी वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हे ध्येय समोर ठेवून उभारण्यात आली. यावेळी मराठी नववर्षाची सुरवात सुरेल जल्लोषात करण्यात आली. महात्मा गांधी उद्यानात झालेल्या पहाटेच्या मंगल कार्यक्रमास जळगावकर रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरवात साधायती संस्कार भारती या ध्येय गीताने करण्यात आली. नमू या निसर्ग जग निर्माता’ या नांदीने स्वानंद देशमुख यांनी सुरेल मैफिलीचा श्रीगणेशा करण्यात आला. जय गंगे भागीरथी’ या रसिका जोशींच्या नाट्यगीताने गंगेची आराधना केली. तुझी शेतवाडी विठूचा देव्हारा’ या मिलींद देशमुखांच्या भक्तिगीताने वेगळीच रंगत आणली. सूर्येदयाला अर्ध्य देऊन सुवासिनी महिलांनी गुढीचे पूजन केले. त्याचवेळी गायिकांनी नद्या आपुले जीवन देऊ त्यांना जीवदान गुढी उभारून नववर्षाचे गाऊ मंगलगान’ हे नववर्षाचे स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गांगुर्डे व ज्योती पाटील यांनी केले.

या गीतांचे झाले सादरीकरण
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’ हे गाजलेले निसर्ग गीत प्रशांत गांगुर्डे यांनी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग अपूर्वा बारस्कर यांनी, संथ वाहते कृष्णामाई दृश्यांत जोशी यांनी सादर केले. तुफान आलं या’ हे पाणी फाउंडेशनचे शीर्षकगीत अंजली धुमाळे व भागवत पाटील यांनी सादर केले. नंदीबाई माय माझी’ हे गीत ज्योती पाटील, तपत्या झळा उन्हाच्या ही गझल श्रुती वैद्य यांनी तर पर्णपाचू सावळा हे गिरीश मोघे यांनी सादर केले. प्रसंगी प्रभो रामराया या सामूहिक भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला.

रांगोळ्यांनी सजला परिसर
रांगोळी विभागाच्या कलाकारांनी संपूर्ण परिसर रांगोळ्यांनी सजविला. रांगोळी रेखाटन रेखा लढे, वर्षा बर्‍हाटे, शारदा सावदेकर, सुनंदा सुर्वे यांनी केले. उपस्थितांना कडूनिंब, गुळाच्या आरोग्य रक्षक गोळ्या देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष किशोर सुर्वे, संरक्षक काशिनाथ लाठी, दीपक चांदोरकर उपस्थित होते.

प.वि.पाटील विद्यालयात उभारली मतदानाची गुढी

संकल्प मतदानाचा सण करू साजरा गुढी पाडव्याचा’ या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात गुढी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकी साठी सर्व मतदातांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही बळकट करावी यासाठी गुढी सोबत मतदान जनजागृती करत विविध प्रकारचे घोषवाक्य लिहून व घोषणा देऊन सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर यशस्वीतेसाठी उपशिक्षिका सरला पाटील , कल्पना तायडे , दीपाली चौधरी , सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या घोषवाक्याव्दारे जनजागृती
मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा ’ , ’मतदानाचा अभिमान हीच लोकशाहीची शान’, ’वृद्ध असो किंवा जवान सर्व जण करा अवश्य मतदान ’ , ’वोट हमरा है अधीकार ,नही करेंगे इसको बेकार ’ ,’ लालच देकर वोट जो मांगे ,भ्रष्टाचार करेंगा आगे ’ , ’ ना नशेसे ना नोट से , किस्मत बदलेगी वोट से ’ अशा घोषवाक्यांनी मतदार जनजागृती करण्यात आली.

संघर्ष अपंग कल्याण संस्थेतर्फे नववर्षानिमित्त जनजागृती
जळगाव- शहरातील संघर्ष अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे गुढीपाडवा तसेच मराठी नववर्षानिमित्ताने 6 रोजी सकाळी 10 वाजता बळीराम पेठे येथे वृक्षारोपण करण्यात आले. संघर्ष अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, राजेश बाविस्कर, किशोर नेवे, भुपेष जैसवाल, गोविंद देवरे, संतराम एकशिंगे, सचिन खैरनार, जितेंद्र पाटील, राजेंद्र वाणी, प्रविण भोई उपस्थित होते. एप्रिल ते मे या दोन महिन्यात संघर्ष अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात पाणी बचतीचा संदेश मतदान जनजागृती, पर्यावरण वाचवा, रक्तदान श्रेष्ठदान, झाडे लावा झाडे जगवा, दिव्यांगासाठी स्वावलंबन कार्ड नोंदणी, तसेच व्ही.व्ही पॅट च्या माध्यमातूनही मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. नववर्षदिनी वृक्षारोपणापासून सुरुवात झालेल्या उपक्रमाचा रक्तदान शिबिराने समारोप होणार आहे.