ठाणे : स्वातंत्र्यदिनी घातपाताचा रचण्यात आलेला कट उधळण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ठाण्यातील मिनी पाकिस्तान म्हणून ओळखले जाणार्या मुब्र्यात छापा टाकून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि डिटोनेटर हस्तगत केलीत. या स्फोटकांप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस त्यांची कसून चौकशी करत होते. इस्माईल शेख, अब्दुल्ला शेख आणि महेंद्र नाईक अशी त्यांची नावे आहेत. मुब्र्यातील भंगार कारखान्यात ही स्फोटके लपवून ठेवण्यात आलेली होती.
सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
रेल्वे पोलिसांनी छापा टाकून अमोनियम नायट्रेट आणि नऊ डिटोनेटर जप्त केली असून, सुरक्षा यंत्रणांच्या तपासात 15 किलो स्फोटकेही हस्तगत करण्यात आलेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटके येथे आली कुठून, तसेच त्यांचा कोणत्या कारणांसाठी वापर केला जाणार होता, याची माहितीही तपास यंत्रणा घेत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, पोलिस उपायुक्त स्वामी यांच्या आदेशानुसार, याप्रकरणाचा तपास डाइघर पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. हे पोलिस अधिकारी एटीएस अधिकार्यांच्या सहकार्याने तपास करत आहेत. अमोनियम नायट्रेटचा वापर आयईईडी तयार करण्यासाठी केला जात असतो. त्याचा वापर यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटात करण्यात आला होता. स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट)च्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, राजधानी दिल्लीसह मुंबईतही सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.