‘स्वातंत्र्यसेनानी स्मृती स्तंभा’वर नामोल्लेखाची मागणी

0

राजगुरुनगर : येथील खेड तालुका पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानींच्या स्मरणासाठी एक स्मृती स्तंभ आहे. परंतु स्वातंत्र्याच्या सत्तरीतही त्याच्यावर तालुक्यातील सर्व स्वातंत्र्यसेनानींची नावे उपलब्ध नाहीत अशी खंत स्वातंत्र्यसैनिकांच्या वंंशजांंनी व्यक्त केली आहे.स्वातंत्र्यसैनिकांच्या तालुक्यातील नावांबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध असतानाही आणि कागदोपत्री शासकीय नोंदीत पंधरा स्वातंत्र्यसैनिक असताना केवळ पाचच नावे लावल्याने स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनी मात्र स्वातंत्र्याच्या सत्तरीत तरी स्वातंत्र्यसैनिकांची नावे या स्तंभावर लावून आमच्या मागणीला न्याय द्या अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आमच्या पूर्वजांनी ‘याचसाठी का केला होता अट्टाहास?’ असेही म्हणायची वेळ त्यांच्या वंशजांवर आली आहे असे याविषयी कै. मोरेश्वर सुतार या स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज जयकुमार कहाणे यांनी सांगितले.

स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1973 साली राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक तालुक्यात ‘स्वातंत्र्यसेनानी स्मृती स्तंभ’ उभे केले. खेड तालुक्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंसह आणखी स्वातंत्र्यसैनिक होऊन गेल्याचा उल्लेख शासकीय दस्तऐवजांत सापडतो. खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदीरा अस्वार म्हणाल्या, यापूर्वीच तालुक्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांची नावे स्तंभावर असणे आवश्यक आहे. परंतु आता पंचायत समितीकडून लक्ष घालून नव्याने स्तंभ उभा करून त्यात सर्व नावे सामाविष्ठ केली जातील किंवा याच स्तंभाशेजारी आणखी एक स्तंभ उभा करून त्यात इतर नावांचा समावेश केला जाईल.