स्वाभिमानी संघटनेचे आमारण उपोषण

0

शेतकर्‍यांची लुबाडणूक व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
तहसील कार्यालयसमोर उपोषणास सुरूवात

शहादा । हमी भावापेक्षा कमी दराने शेतकर्‍यांकडून शेतीमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांवर शेतकर्‍यांची लुबाडणूक व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे.शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासनाने हरभर्‍यासाठी 4 हजार 400 रूपये प्रती क्विटंल हमीभाव जाहीर केला असतांनाही व्यापार्‍यांकडून मात्र यापेक्षा कमी दराने हरभरा खरेदी केला जात आहे. हमीभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या माध्यमाने लिलाव बंद ठेवला आहे.

संघटनेच्या प्रतिनिधीसह चर्चा निष्फळ
हरभरा मालास हमीभाव मिळावा तसेच कमी दराने खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आमरण उपोषण करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे गुरूवारी तहसिलदारांना देण्यात आली होती. शनिवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, व्यापारी प्रतिनिधी प्रकाश जैन, तहसीलदार मनोज खैरनार, सहाय्यक निबंधक निरव चौधरी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी व शेतकरी प्रतिनिधीमध्ये चर्चा झाली.

दुपारी 3 वाजता उपोषणास सुरूवात
मात्र, या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने दुपारी 3 वाजेपासून घनश्याम चौधरी व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरू केले आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल होत नाही तसेच शासनाच्या हमी भावाप्रमाणे बाजार समितीत खरेदी प्रक्रीया सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.