शहादा। शहरातील मुख्य व वर्दळीचा रस्ता पटेल रेसीडेंसी ते महाराणा प्रताप चौक असून या रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्रासमोर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. तेथे पाण्याचे डबके वजा तलाव निर्माण झाल्याने वाहनधारक, नागरिक, व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा अडथळा निर्माण होत असून नगरपालिकानेही समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरते आहे. आता पावसाळ्यात तर पावसाच्या पाण्याचे डबके साचून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
सळया निघाल्यात.. तर कुठे खड्डे पडलेत
शहरातील पटेल रेसीडेन्सी ते महाराणा चौक दरम्यानच्या रस्ताचे काही महिन्यापूर्वी काँक्रेटीकरण झाले आहे.मुदतीपुर्वीच आज या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर कुठे सळया निघाल्या आहेत तर कुठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. विद्यार्थ्यांना तर शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग आहे.न.पा.चे.बरेच नगरसेवकांचाही याच रस्त्यावरून ये-जा सुरू असते.स्वामी समर्थ केंद्राजवळ पाऊस पडला की, अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त होते. डबके साचल्याने दुर्गंधी परिसरात पसरते त्यामुळे रस्त्यावरून चालताना देखील त्रास होतो.
समस्या मार्गी लावणे गरजेचे
न. पा. अध्यक्ष मोतीलाल पाटील व त्यांचे सहकारी नगरसेवक, न. पा. मुख्याधिकारी यांनी शहरातील खड्यांची साम्राज्याची दखल घेऊन वार्डावार्डात खडी मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे. आता या स्वामी समर्थ मंदिरासमोरील ख़ड्डावजा तलावात मुरूम टाकून ही समस्या मार्गी लावावी. केंद्र शासनाची समिती येणार असल्याने ह्या मुख्य रस्त्यावरील ही समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रीया रहिवासी,वाहनधारक व विद्यार्थी वर्गांकडून उमटत आहेत.त्यासोबत या रस्त्यांमुळे लहानसहान अपघात देखील या रस्त्यांवर होत असतात. याकडे पालिकेने गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
साचलेल्या पाण्याची दुर्गंधी
तेथे खोलगट भाग असल्याने तेथिल पाणी निघायला जागा नाही.साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येते. मंदिर परीसर व आजूबाजूच्या रहीवाशींना या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याच परीसरात लहान मुलांचे प्रसिद्ध डॉक्टरांचे दोन मोठे दवाखाने आहेत. ग्रामीण भागातून या दवाखान्यात येणा-या नागरीकांनाही या समस्येला सामोरे जावे लागते.पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराई व आजारांचे प्रमाण वाढते. याकडे लक्ष दिले गेले नाही तर नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागेल अशी नागरिकांची रस्त्यासंबंधी नाराजी दिसून येत आहे.