स्वावलंबनाने घेतलेल्या शिक्षणातूनच होईल खरी प्रगती : डॉ. पंडित विद्यासागर

0

तळेगाव दाभाडे । शिक्षण संक्रमणावस्थेतून जात आहे. त्याचे मापदंड निश्‍चित करताना गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरच्या उपयोगितेवर चर्चा होणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाबरोबरच शिकविण्याच्या पद्धतीचा स्तरही बदलला पाहिजे. आपण काय व कसे शिकतो हे महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी इतरांवर अवलंबून न राहता शिकले तरच प्रगती होईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी बुधवारी केले.इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी ‘उच्चशिक्षणातील बदलती आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार
आमदार संजय (बाळा) भेगडे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, बबनराव भेगडे, डॉ. प्रसन्न देशमुख आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. डॉ. विद्यासागर आणि नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचा यावेळी कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ आणि डॉ. बी. बी. जैन लिखित पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कौशल्ये आत्मसात करा
डॉ. विद्यासागर यांनी शिक्षणपध्दतीतील कालबाह्यता आणि आवश्यक असलेल्या बदलांचा वेध घेतला. यशस्वी होण्यासाठी शिक्षणाबरोबरच कौशल्येदेखील आत्मसात केली पाहिजेत. आपल्यातील गुणअवगुणांचे मूल्यमापन स्वत: कठोरपणे करणे गरजेचे आहे. जे असाध्य वाटते त्यास ध्येय ठेवा. आसपासचे लोक आत्मविश्‍वास नामोहरम करणारे असतात. त्याकडे दुर्लक्ष करून आडवाटा शोधा, असे त्यांनी सांगितले.

संकुचित मानसिकता बदला
आमदार बाळा भेगडे यांनी तळेगावात भारत कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. या व्याख्यानमालेतून शिक्षणाच्या नव्यापर्वाचा इतिहास घडवला जाईल, असा विश्‍वास आमदार भेगडे यांनी व्यक्त केला. शिक्षणाबाबतची संकुचित मानसिकता बदलली पाहिजे. विज्ञाननिष्ठा, विवेकवाद आणि मानवतावादी मूल्यांना जोपासले पाहिजे. मनाची मशागत आणि सामाजिक भान विकसित करण्यासाठी अवांतर वाचनाशिवाय पर्याय नाही, असे डॉ. देशमुख म्हणाले.