आळंदी : आळंदी नगरपालिकेतील शिवसेना स्वीकृत नगरसेविका सविता गावडे यांनी सदस्य पदाचा राजीनामा पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी दत्तात्रय लांघी यांचे कार्यालयात दिला असल्याने 2 स्वीकृत सदस्य निवडीचा आळंदीतील मार्ग मोकळा झाला आहे. पुणे कार्यालयातून आळंदी नगरपरिषदेस राजीनामा देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. आळंदी नगरपरिषद भाजपचे स्वीकृत सदस्य दिनेश घुले व शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेविका सविता गावडे यांनी राजीनामे दिल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत.
स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर करतील असे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. नगरसेविका सविता गावडे यांनी इतर कार्यकर्त्ये यांना या पदावर कामाची संधी मिळावी म्हणून पक्षादेश मान्य करून राजीनामा दिला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे राजकीय वर्तुळात यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आळंदी नगरपरिषद शिवसेनेचे गटनेते तुषार घुंडरे यांनी स्वीकृत सदस्य सविता गावडे यांनी देखील पक्षादेश स्वीकारून राजीनामा दिल्याचे सांगितले.