स्वीकृत सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम लांबणीवर

0

तळेगाव दाभाडे नगरपरिषद : भाजप सदस्याचा अद्याप राजीनामा नाही!

तळेगाव दाभाडे । तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडणूक कार्यक्रमाकडे इच्छुकांचे डोळे लागून राहिले आहे. सध्या एका विद्यमान स्वीकृत सदस्याच्या राजीनाम्यावर ही निवडणूक अवलंबून असल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडत आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये सदस्य संख्याबळानुसार 3 स्वीकृत सदस्य आहेत. भाजप, जनसेवा विकास आघाडी, रिपब्लीकन पक्ष यांच्या महाआघाडीला नगरपरिषदेमध्ये स्पष्ट बहुमत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे 14 आणि जनसेवा विकास आघाडीचे 6 नगरसेवक आहेत. तर विरोधी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे 6 सदस्य आहेत.

ठरलेल्या मुदतीत राजीनामे
एक वर्षापूर्वी झालेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत भाजप, जनसेवा विकास आघाडी आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती यांना प्रत्येकी एक सदस्याची जागा मिळाली होती. त्यातील जनसेवा विकास आघाडीचे सचिन टकले आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे विशाल अशोक दाभाडे यांनी ठरलेल्या मुदतीप्रमाणे राजीनामे दिलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ स्वीकृत नगरसेवक इंदरमल ओसवाल यांचा राजीनामा मात्र झालेला नसल्याने निवडणुकीचा कार्यक्रम लागण्यास विलंब होत आहे.

भाजपची चालढकल
स्वीकृत सदस्य पदासाठी भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. तर जनसेवा विकास आघाडीने स्वीकृत सदस्य पदासाठी सुनील कारंडे यांचे नाव निश्‍चित केल्याचे तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीने आनंद भेगडे यांचे नाव निश्‍चित केल्याचे समजते. भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीकडून राजीनामा आणि नाव निश्‍चिती बाबत चालढकल होत असल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षासह 27 नगरसेवक आणि 3 स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यापैकी 14 महिला नगरसेविका आहेत. महिलांचे बहुमत असतानाही एकाही महिलेला स्वीकृत सदस्य म्हणून कोणत्याही पक्षाने संधी दिलेली नाही. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. मात्र, काही महिला स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपआपल्या पक्षश्रेष्ठींना साकडे घालत आहे.