स्व.बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकर्‍यांचा सर्वांगीण विकास साधणार : दादाजी भुसे

धुळे। तळागाळातील प्रत्येक शेतकर्‍याचा सर्वांगीण विकास हेच शासनाचे लक्ष आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकर्‍यांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान २०२०-२१ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा शुभारंभ कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बारीपाडा येथे करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ.मंजुळा गावित, चैत्राम पवार, पं.स.चे सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सरपंच सुनिता बागुल, अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, जि.प.चे कृषी अधिकारी पी.एम.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सी.के.ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकीकरण अभियान २०२०-२१ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी अवजारे वाटपाचा कार्यक्रम मंत्री भुसे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर मंत्री भुसे यांनी शेतकरी सोमनाथ चौरे व मोतीराम पवार यांच्या शेतशिवाराची पाहणी केली. आदिवासी बांधवासोबत मंत्री भुसे यांनी जेवणाचाही आस्वाद घेतला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री त्यांच्या वाढदिवशी थेट आदिवासी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून शेतशिवाराची पाहणी करत शासकीय योजनांचा लाभ देणार्‍या मंत्र्याचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देशबंधु ग्रो रिसर्च कंपनीच्या आढावा बैठकीत कंपनीच्या कामकाजाचा मंत्री भुसे यांनी आढावा घेतला. सर्व सदस्यांशी संवाद साधत कंपनीच्या प्रगतीचा सर्व लेखाजोखा त्यांनी जाणून घेत त्यांच्या अडचणी व समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.