हक्काच्या घरासाठी मंत्रालयात घुसून रहिवाशांचे आंदोलन

0

ओमकार बिल्डर्स विरोधात नागरिकांचा संताप

मुंबई :- एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील गरिबांना २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे आश्वासन सरकारने दिले असतानाच मालाड येथील एसआरएच्या घरांच्या मागणीसाठी शेकडो झोपडीवासीयांनी मंत्रालयात घुसून ठिय्या आंदोलन केले. मालाड पूर्व येथील कुरार इथल्या शांताराम तलाव येथील जानू भोईर गृहनिर्माण संस्थेच्या शेकडो रहिवाश्याना ओंकार या प्रसिद्ध विकासकाने अपात्र घोषित केले असून त्यामुळे आम्हाला हक्काची घरे मिळणार नाहीत यासाठी हे रहिवाशांनी थेट मंत्रालयात घुसून त्रिमूर्ती प्रांगणात आंदोलन केले. यावेळी सचिवांशी शिष्टमंडळाची चर्चा सुरु असतानाच प्रांगणात बसलेल्या रहिवाशांना पोलिसांनी उचलून मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात नेले.

गेल्या चार वर्षांपासून शांताराम तलाव येथे इमारतींचे बांधकाम सुरु आहे. एकूण सहा इमारतींपैकी तीन इमारतींचे काम पूर्ण झाले असूनही विकासकाने शेकडो लोकांना अपात्र घोषित केले आहे. यावर नगरविकास विभाग आणि एसआरए कार्यालयात खेटे मारूनही याबाबत योग्य दाखले मिळत नसल्याने थेट मंत्रालयातच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्थानिक रहिवासी बच्चूलाल चव्हाण यांनी सांगितले. 2007 साली ओमकार बिल्डरने आपल्याशी करार केला असून 2011 पासून आमची घरे तोडण्यास सुरूवात केल्याचे रहिवासी बच्चूलाल चव्हाण यांनी सांगितले. पाच वर्ष त्यांनी आपल्याला ठरल्यानुसार धानादेशाद्वारे पैसे दिले. मात्र, आता विकासक आपल्याला अपात्र ठरवून घरे देण्यास टाळाटाळ करत असून यामुळे तब्बल 94 कुटुंब बेघर झालो असल्याचा असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. गृहनिर्माण विभागाचे सचिव संजय कुमार यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ही भेट नाकारली असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

गेली दीड वर्ष आम्ही पश्चिम द्रुतगी मार्गावर आंदोलन करत होतो. मात्र, आमच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. वेळोवेळी आम्ही नगरसेवक असो, मंत्री असो सर्वांची भेट घेतली मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. आम्हाला विकासकाने अपात्र ठरवले असून आपण पात्र असल्याचे पत्र सरकारकडून आणण्यास सांगितले असल्याचे आंदोलनाला बसलेले रहिवासा केतन नंदवाना यांनी सांगितले. तसेच सध्या सदर विकासक आम्हाला पैसे घेऊन जाण्यास किंवा मीरारोड भाईंदर या ठिकाणी घरे घेण्यास सांगत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. आम्ही सचिव संजय कुमार यांच्याकडे निवेदन सादर केले असून आम्हाला आमच्या हक्काची घरे न मिळाल्यास आपले आंदोलन सुरूच राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात प्रवेश पत्र काढून शेकडोंच्या संख्येने दाखल झालेले झोपडीवासी यांनी अचानक मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात ठिय्या दिल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मंत्रालय सुरक्षे व्यवस्थेचे प्रमुख प्रशांत खैरे यांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मंत्रालयात मागवला. दरम्यान पोलीसानी आंदोलकांशी चर्चा करत गृहनिर्माण विभागाच्या सचिवांशी भेट घालून दिली. भेट झाल्यांनंतरही आंदोलकांनी जागेवरून न उठण्याचा पवित्रा घेतला. यांनतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना बाहेर काढले.