यावल (शेख काबीज)- हजयात्रा 2019 साठी झालेल्या भारतीय भाविकांच्या कोट्यात झालेल्या वाढीचा लाभ महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यातून हज कमिटीसह स्वतंत्र टूर्सने हजयात्रेला जाणार्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. हजयात्रा 2019 साठी जळगाव जिल्ह्यातून कमिटी व स्वतंत्र टूर्सने आठशेच्यावर भाविक जाणार असल्याची माहिती जिल्हा कमिटीचे सदस्य खालीद बागवान (जळगाव) यांनी दिली.
आठशेवर भाविक जाणार हजला
जिल्ह्यातून हज कमिटीतर्फे काढण्यात आलेल्या सोडतीत 535 भाविकांचा क्रमांक लागला होता. त्यानंतर भाविकांच्या कोट्यात वाढ झाली आहे. त्याचा लाभ महाराष्ट्रासह जिल्ह्यालाही मिळाला आणि त्यात 100 पेक्षा जास्त प्रतीक्षा यादीत असलेल्या भाविकांचा क्रमांक लागल्याचेही बागवान यांच्याकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातून हज कमिटीतर्फे जाणार्या भाविकांची संख्या सुमारे 650 झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातून स्वतंत्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने शंभर ते दीडशे भाविक यात्रेला जाणार असल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारे एकूण आठशेच्या वर भाविक हज यात्रेचा लाभ घेणार आहे.
25 हजारांनी कोट्यात वाढ
हजयात्रा 2019 साठी भारतीय भाविकांच्या कोट्यात पंचवीस हजारांनी वाढ झाली. वाढीव कोट्यापैकी हज कमिटीला पंधरा हजार तर स्वतंत्र टूर्स अँड ट्रॅव्हल्सला दहा हजार भाविकांचा कोटा मिळाला. याचा सर्वाधिक लाभ म्हणजे दोन हजार 379 भाविक महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्राचा कोटा सुमारे पंधरा हजार झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजला जाण्यास सुरुवात- येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भारतीय भाविक हजयात्रेला जाण्यास सुरुवात करणार आहे. .4 जुलैपासून दिल्ली, गया (बिहार), श्रीनगर येथून भाविक जाण्यास सुरूवा होणार आहे. महाराष्ट्रातील भाविक 14 जुलैला पाठवून मुंबई येथून तर नागपूर येथून25 जुलैपासून हज यात्रेला जाणार आहेत.