हडपसरच्या विकासासाठी निधी देऊ : गिरीश बापट

0

हडपसर । युवा मोर्चा संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तरुणांचे संघटन मजबूत करताना तितक्याच ताकदीने आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी आग्रही राहणार्‍या आमदार योगेश टिळेकर यांना त्यांच्या भागाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आश्‍वासन दिले. हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काळेपडळ येथील मैदानात आयोजित स्नेहमेळाव्यात पालकमंत्री बापट बोलत होते. हडपसर मतदारसंघ आणि महाराष्ट्रात युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून टिळेकर चांगले काम करत असल्याचे बापट यांनी सांगितले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार भीमराव तापकीर, आमदार बाळा भेगडे, भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुभाष जंगले, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेवक मारूती तुपे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, नगरसेवक संजय घुले, संजय
सातव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

टिळेकर राजकारणातले महाराष्ट्र केसरी
पालकमंत्री बापट म्हणाले की, राजकारणातील कुस्त्या ही तुमच्याकडून शिकल्या पाहिजेत. कधी कोणाच पट काढावा कधी कोणाला धोबीपछाड टाकावी हे टिळेकरांना समजते. त्यामुळे राजकारणात आमदार टिळेकर महाराष्ट्र केसरी झाले आहेत, अशी मिश्किल टिपण्णी पालकमंत्री बापट यांनी केली.

मेट्रो सुरू करण्याचा विश्‍वास
महाराष्ट्र केसरी विजेता पै. अभिजीत कटके याचा आमदार टिळेकर मित्र परिवाराकडून यावेळी सत्कार करण्यात आला. मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यात हडपसरला प्राधान्य दिले जाईल, याशिवाय हडपसर कचरामुक्त केले जाईल. 24 तास पाणी देण्याचे नियोजनही लवकरच पूर्ण होईल, असे बापट यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या सय्यदनगर-ससाणेनगरचा रेल्वेक्रॉसिंगचा प्रश्‍न मार्गी लागला असून त्यासाठी 11 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अंडरपाससह हडपसरपर्यंत मेट्रो धावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला.